- योगेश बिडवई।मुंबई : चित्रपट व टीव्ही तंत्रज्ञांच्या संघटना सतत संपाचे हत्यार उपसत असल्याने त्याचा २० हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या मनोरंजन उद्योगाला फटका बसत आहे. संघटनांची दडपशाही व अवास्तव मागण्यांना कंटाळून चित्रपट निर्माते व हिंदी टीव्ही वाहिन्यांनी किफायतशीर खर्चात मालिकांची निर्मिती होण्यासाठी परराज्यांत शूटिंग सुरू केले आहे.सध्या ‘१३ बिग बजेट’ हिंदी मालिकांचे (डेली सोप) परराज्यात शूटिंग सुरू आहे. त्यामुळे १२ लाख रोजगार देणारा मनोरंज उद्योग मायानगरी मुंबईबाहेर चालला आहे. चित्रपट व टीव्ही मालिकातील तंत्रज्ञांच्या २२ संघटनांच्या मागण्यांनुसार गेल्या महिन्यापासून ७.५ टक्के वेतनवाढ व इतर सुविधा मिळाल्या. तरीहीही ‘फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने दडपशाही करत १५ आॅगस्टपासून संप पुकारला होता.मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ .आशिष शेलार यांच्या व कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या मध्यस्थीने बुधवारी संपावर तोडगा निघाला. मुळात या संपाला पाठिंबा नव्हता. त्यामुळे मुंबईतील एकही शुटिंग रद्द झाले नाही, अशी माहिती ‘इंडियन फिल्म अॅण्ड प्रोड्युसर्स कौन्सिल’चे सहअध्यक्ष जे. डी. मजिठिया यांनी लोकमतला दिली. सततच्या संपाचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली, गुजरातला पसंतीसंघटनांच्या अवास्तव मागण्यांमुळे मुंबईत शूटिंगचा खर्च वाढत आहे. त्यामुळे गुजरातमधील उंबरगाव व वडोदरा तसेच दिल्ली येथे बड्या चॅनेलच्या मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. झी टीव्हीने जयपूरजवळ जागा घेतली असून तेथे शुटिंगसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.हिंदी मालिकांच्या निर्मात्यांना ब्रॉडकास्टर्सकडून (हिंदी चॅनेलचे संचालक) परराज्यात शूटिंगसाठी आग्रह केला जात आहे. तेथेही मुंबईसारख्याच सुविधा आहेत. त्यामुळे मालिकांचे निर्माते हळूहळू परराज्यात शुटिंग करू लागले आहेत. संप, धाकदडपशा यांचे प्रमाण वाढले तर मुंबईबाहेर कायमचे शूटिंग सुरू होण्याची भीती आहे. हे टाळायला हवे.- जे. डी. मजिठिया, सह-अध्यक्ष, आयएफटीपीसी
मनोरंजन उद्योग मायानगरी मुंबईबाहेर! सततच्या संपांमुळे हिंदी मालिकांचे परराज्यांत शूटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 3:36 AM