उद्योजकांमध्ये उत्साह अन् शेअर बाजारातील घसरणीनंतर शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:00 PM2020-02-01T23:00:04+5:302020-02-01T23:00:20+5:30

काही तरतुदींचे स्वागत

Enthusiasm among entrepreneurs and peace following the decline in the stock market | उद्योजकांमध्ये उत्साह अन् शेअर बाजारातील घसरणीनंतर शांतता

उद्योजकांमध्ये उत्साह अन् शेअर बाजारातील घसरणीनंतर शांतता

Next

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही प्रमाणात दिलासा देणारा तर काही प्रमाणात निराशा करणारा आहे, असे मत सर्व स्तरांतून व्यक्त केले जात आहे. जेथे अर्थकारण प्रत्यक्ष चालते अशा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीमध्ये अर्थसंकल्पाविषयी कमालीची उत्सुकता होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाचे वाचन करीत असताना येथील वातावरणाचा चेहरा क्षणाक्षणाला बदलत होता. शेअर बाजारात घसरण आल्यानंतर येथे शांतता पसरली होती.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. याचे थेट प्रक्षेपण चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीमध्ये सुरू होते. आयएमसीमध्ये सीतारामन यांचे भाषण सुरू असताना दर १० ते १५ मिनिटांनी भाषणाचे मुद्दे असलेले पत्रक उपस्थितांना देण्यात येत होते. सकारात्मक निर्णयानंतर उद्योजकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. काही उद्योजकांनी टेबल वाजवून दाद दिली. याच दरम्यान शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उताराचा परिणामही पाहायला मिळाला.

याविषयी बोलताना आयएमसीचे अध्यक्ष आशिष वैद्य म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक आणि आर्थिक बाबींची काळजी घेण्यात आली आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘स्टडी इन इंडिया’ चांगली संकल्पना आहे. ‘आयुष्मान भारत’ संकल्पनेचा कालावधी वाढवला आहे. तो वृद्ध व्यक्ती आणि इतरांसाठी चांगला निर्णय असून, आरोग्यदायी भारतासाठीचे पाऊल आहे.

आयएमसीचे महा संचालक अजित मंगरूळकर म्हणाले, आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांसाठी घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. पायाभूत सुविधा जसे महामार्ग, नवीन १०० विमानतळे यामुळे विकासाला चालना मिळेल.

Web Title: Enthusiasm among entrepreneurs and peace following the decline in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.