लोकलचा आवाज ऐकण्याची उत्सुकता चिमुरडीच्या जीवावर बेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:06 AM2019-03-13T06:06:07+5:302019-03-13T06:07:17+5:30
काळाचौकीतील घटना; काही मिनिटांच्या नजरचुकीमुळे घडला अपघात
मुंबई : रांगत रांगत दीड वर्षाची चिमुरडी गच्चीवर पोहोचली. लोकलच्या आवाजाच्या उत्सुकतेमुळे इमारतीच्या कठडा नसलेल्या चौथ्या मजल्यावरील गच्चीच्या टोकावरून ती खाली कोसळल्याची धक्कादायक घटना काळाचौकी परिसरात मंगळवारी घडली. आरोही राणे असे चिमुरडीचे नाव आहे.
चिंचपोकळी येथील पाच मजली प्रोग्रेसिव्ह को-आॅप. सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर आरोही आईवडील, काका आणि १० वर्षांच्या बहिणीसोबत राहायची. मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास आरोही घराबाहेर खेळत होती. तर काका दारातच दात घासत होते. थोड्या वेळाने तोंड धुण्यासाठी ते घरात गेले. बाहेर आल्यानंतर आरोही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खालच्या मजल्यापर्यंत जाऊन पाहिले. मात्र ती कुठेच सापडली नाही. बरीच शोधाशोध केल्यानंतर तासाभराने कुटुंबीयांनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट आव्हाड यांच्यासह २५ ते ३० पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील प्रत्येक घरात शोध घेतला. दोन तासांच्या शोधानंतर, चौथ्या मजल्यावरील बंद खोलीचा दरवाजा उघडून ते गच्चीवर आले. तेव्हा, गच्चीवरील एका कोपऱ्यात आरोही जखमी अवस्थेत सापडली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते.
प्राथमिक तपासात, आरोहीला रांगण्याची सवय होती. त्यामुळे ती रांगत रांगत गच्चीपर्यंत पोहोचली. लोकलच्या आवाजाच्या दिशेने ती १० फूट रांगत पुढे गेल्याचे तेथील खुणांवरून दिसते. पुढे, टोकावर आल्याने तसेच गच्चीला कठडा नसल्याने तोल जाऊन ती चौथ्या मजल्यावरील पाइप आणि शेडमध्ये अडकली. तेथे बरीच अडगळ असल्याने ती अडकल्याचे चटकन कुणाच्या नजरेत आले नाही.
तिच्या अंगावर कुठल्याही स्वरूपाच्या संशयास्पद खुणा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकलच्या आवाजाच्या उत्सुकतेमुळेच ती तिथपर्यंत पोहोचल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी अपघाती मत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
‘पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या!’
अवघ्या काही मिनिटांच्या नजरचुकीमुळे आरोही रांगत गच्चीवर पोहोचली. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीला कठडा नव्हता. त्यामुळेच तेथे रांगत गेलेली आरोही खाली कोसळूल अडगळीत अडकली. याच अडगळीमुळे तिला रहिवाशांसह पोलिसांनाही शोधणे कठीण झाले होते. गच्चीला कठडा असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रया आता रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.