मुंबई : मुंबई महानगरपालिकेने एकूण नऊ केंद्रांवर ३२ लसीकरण कक्ष तयार केले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी उत्साहाने येताना दिसले, मात्र त्यानंतर लसीच्या दुष्परिणामांविषयी बाब समोर आल्याने या उत्साहावर विरजण पडत असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात बुधवारी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी अत्यंत कमी आरोग्य कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.
केंद्र सरकारच्या को-विन ॲपमधील तांत्रिक बिघाड दूर केल्यामुळे दोन दिवस स्थगित करण्यात आलेली लसीकरण प्रक्रिया राज्यासह मुंबईत हळूहळू पूर्वपदावर येते आहे. मात्र लसीचे दुष्परिणाम राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर उघडकीस आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे. सामान्यतः कोणत्याही लसीकरणानंतर सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना काहीसा ताप, अंगदुखी वगैरे लक्षणे दिसून आली, मात्र कोणत्याही स्वरूपाचे गंभीर परिणाम नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी निर्धास्तपणे लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे.
शहर उपनगरात केईएम रुग्णालय आतापर्यंत लसीकरण प्रक्रियेत अग्रक्रमी आहे. केईएम रुग्णालयात मागील तीन दिवसांत ९१२ कर्मचाऱ्यांनी लसीकरण घेतले आहे. केईएम रुग्णालयात बुधवारीही ५०० कर्मचाऱ्यांची यादी होती, त्यात ३६२ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. तर सायन रुग्णालयात ४०० कर्मचाऱ्यांची नोंदणी होती, मात्र १३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा डोस घेतल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. नायर रुग्णालयातही ३०० जणांची नोंदणी होती, परंतु १५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केले. तर वांद्रे कुर्ला संकुल जम्बो कोरोना केंद्र प्रशासनाने १३५ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे, या केंद्रात ३८० कर्मचाऱ्यांनी नोंदणी होती.
चौकट
रुग्णालय/कोविड केंद्रलाभार्थी
केईएम ३६२
सायन १३५
कूपर १४९
नायर १५४
व्ही.एन. देसाई ५७
राजावाडी २६२
जम्बो केंद्र (एनएससीआय) १३३
भाभा १५५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) ३०६
जे.जे. १५
जे.जे. रुग्णालयात दिवसभरात केवळ १५ जणांना लस
भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोवॅक्सिन लस ही राज्यातील सहा ठिकाणी देण्यात येत आहे. त्यामध्ये चार वैद्यकीय महाविद्यालये आणि दोन जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय आणि खासगी डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोवॅक्सिन लसीचे २० हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यात पोहोचविण्यात आले आहेत. जे. जे. रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी केवळ १५ जणांनी लस घेतली, त्यापूर्वी मंगळवारी १३ जणांना लसीचा डोस देण्यात आला होता. दिवसभरात १०० जणांना डोस देणे अपेक्षित होते, मात्र ते उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. काही लाभार्थ्यांना लसीचा दुष्परिणाम म्हणून सौम्य लक्षणेही आढळून आल्याचे समजते.