Join us

लसीकरणाचा उत्साह, दोन पाळ्यांमुळे नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

नवा टप्पा सुरू; उन्हाचा अडथळा, तरीही काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात गुरुवारी लसीकरणाच्या ...

नवा टप्पा सुरू; उन्हाचा अडथळा, तरीही काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरात गुरुवारी लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर शहर, उपनगरातील पालिका व जम्बो कोरोना केंद्रात लसीकरणासाठी सामान्यांनी गर्दी केलेली दिसून आली. मात्र, उन्हाचा पारा चढलेला असल्यामुळे या उत्साहावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र हाेते. दिलासादायक बाब म्हणजे, दोन पाळ्यांमध्ये लसीकरण होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

नायर रुग्णालयात दुपारनंतर लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे केंद्रावर कोरोनाविषयक नियमांचे पालन होताना दिसून आले. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी वेगळी सोय हाेती. त्यामुळे दोन्ही लसीकरण प्रक्रिया सुलभतेने पार पडताना दिसून आल्या. मात्र, सकाळ सत्राच्या तुलनेत दुपारनंतर गर्दी अधिक हाेती.

नायर रुग्णालयाच्या तुलनेत केईएम रुग्णालयात सामान्यांनी नव्या टप्प्यातील लसीकरणासाठी जास्त उपस्थिती लावली हाेती. त्यामुळे सुरक्षारक्षकांमार्फत एकावेळी केवळ १५ ते २० लोकांनाच लसीकरण कक्षात प्रवेश दिला जात होता. कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जात हाेते. ‘वाॅक इन’ लसीकरण सेवेचा लाभही अनेकांनी घेतला, अशी माहिती लसीकरण केंद्राच्या निरीक्षकांनी दिली.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोरोना केंद्रात सकाळ सत्राच्या तुलनेत दुपारनंतर लसीकरणासाठी अधिक गर्दी हाेती. देशात लसीकरणात अग्रेसर असलेल्या या केंद्रात नोंदणी करुन आलेल्या नागरिकांच्या तुलनेत ‘वाॅक इन’ लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. लसीकरणासाठी पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत महिलांची उपस्थिती अधिक असल्याची माहिती केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी दिली.

* लसीविषयी सामान्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

एकीकडे लसीकरणाची मोहीम व्यापक होत असताना, दुसरीकडे अजूनही सामान्यांच्या मनात लसीकरणाविषयी अफवा, गैरसमज असल्याचे दिसून आले. केईएम रुग्णालयात दिवसभर येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी बऱ्याचजणांनी लसीविषयी विविध प्रश्न, शंका उपस्थित केल्याची माहिती केंद्रावरील डॉक्टरांनी दिली. या सर्व प्रश्न, शंकांचे निरसन करुन त्यानंतर लाभार्थ्यांनी लस घेतल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

* केंद्रांवर खुर्ची, पाण्याची साेय

सर्व लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या लाभार्थ्यांचे उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी प्रतीक्षा कक्षात छत बांधण्यात आले आहे. तसेच बसण्यासाठी खुर्च्या, पिण्याची पाण्याची सोयही उपलब्ध करुन दिली आहे.

* प्रत्येकाने लस घ्या, घाबरु नका

कोरोनाचा कहर प्रदीर्घ काळ पाहिल्यानंतर आज आमच्या घरातील ५ जणांनी लस घेतली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, शिवाय लसीविषयीच्या शंकांचे निरसनही डॉक्टर करत आहेत. त्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी घाबरु नका, त्वरित लस घ्या आणि आराम करा. कोरोनापासून वाचायचे असेल तर लस आवश्यक आहे.

- आनंदी थोरात, केईएम रुग्णालय

* लसीकरण केंद्रावर उत्तम सेवा

सकाळच्या उन्हात लस घेण्यासाठी जायचे कसे, हा प्रश्न होता. मात्र, सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रावर आल्यानंतर येथील सेवा पाहिल्याने दिलासा मिळाला. क्रमांक येईपर्यंत प्रतीक्षेसाठी सावलीत कक्ष तयार करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून लस दिली जात आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर पालिका प्रशासनाने केलेली सोय पाहून बरे वाटले.

- उन्नती शहा, केईएम रुग्णालय

* वेग वाढवायला हवा

कोरोनाचा संसर्ग एक वर्षापेक्षा अधिक काळ टिकून आहे. मात्र, आता आपल्याकडे कोरोना लस आहे ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आणि राज्य शासनाने आता सामूहिक प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्या दृष्टिकोनातून अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या सामान्यांच्या मनात लसीच्या परिणामकारकतेविषयी शंका दिसून येते, त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढवताना जनजागृतीवरही भर दिला पाहिजे.

- ॲड. हर्षित सहस्त्रबुद्धे, नायर रुग्णालय

* मास्कचा वापर कायम करायला हवा

दोन पाळ्यांमधील लसीकरणामुळे दिलासा मिळाला. यामुळे दुपारनंतर लस घेण्यासाठी गेलो त्यावेळी फार सोप्या पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. लसीकरण मोहिमेचा विस्तार होत असताना यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्यासाठी यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर कायम ठेवावा, जेणेकरुन कोरोनाला प्रतिबंध करणे सोपे होईल.

- शैलेश सोनी, नायर रुग्णालय