कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, विस्कळीतपणा, शिवस्मारक कार्यक्रमाला गालबोट
By अतुल कुलकर्णी | Published: October 25, 2018 05:36 AM2018-10-25T05:36:53+5:302018-10-25T05:38:07+5:30
स्मारकाचे समितीचे अध्यक्ष विनायक मेटे अधिकारी, पत्रकारांना कार्यक्रमास नेण्याचा घाट घातला पण कोणतेही नियोजन न केल्याने, या कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला.
मुंबई - शिवस्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ करणार असल्याचे सांगून स्मारकाचे समितीचे अध्यक्ष विनायक मेटे अधिकारी, पत्रकारांना कार्यक्रमास नेण्याचा घाट घातला पण कोणतेही नियोजन न केल्याने, या कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. शिवाय मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी नेण्यात आलेल्या बोटींमध्ये घुसले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. कोणीच कोणाचे ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. बांधकाम विभागाचे अधिकारी या सगळ्या प्रकारात बघ्याची भूमिका घेत फिरत होते. यामुळे सरकारसाठी व राज्यातील जनतेसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली.
ज्या बोटी पत्रकारांसाठी ठेवल्या होत्या त्यात आधीच कार्यकर्ते बसून घोषणाबाजी करत होते. पत्रकारांना तीनची वेळ देण्यात आली होती पण स्वत: मेटे तेथे साडेतीनच्या सुमारास आले. त्याचवेळी भाजपाचे प्रतोद राज पुरोहीत, मुख्य सचिव डी. के. जैन, बांधकाम विभागाचे व शिवस्मारक समितीचे अधिकारी आले. कार्यकर्त्यांच्या घोषणा पाहून राज पुरोहीतही एसी स्पीडबोटीतून घोषणा देत होते. पत्रकार बोटीत बसले आहेत की नाही याची कोणतीही खातरजमा न करता सगळे अधिकारी एसी स्पीड बोटीतून कार्यक्रमासाठी रवाना झाले.
इकडे पत्रकार व कार्यकर्त्यांनी भरलेली बोट सुरुच होत नव्हती. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक झाल्याने शेवटी पत्रकार व कॅमेरामन त्या बोटीतून बाहेर पडले. तेव्हा मेटे यांचे पीए कचरे यांनी तुम्ही जाऊ नका, आम्ही तुम्हाला दुसरी बोट देतो असे सांगून दुसरी बोट बोलावली. दरम्यान आणखी एक बोट तेथे आली त्यात काही अधिकारी, पत्रकार व कार्यकर्ते बसले व तीही बोट निघून गेली त्याचा पुढे अपघात झाला. कचरे यांनी बोलावलेल्या चौथ्या बोटीतही आधी कार्यकर्तेच घुसले. बोटीचा चालक बोट ओव्हरलोड होत आहे, असे सांगत होता तरीही कोणी उतरण्यास तयार नव्हते. त्यातही हा भाग बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसाठी ठेवला आहे, तुम्ही इकडे बसू नका असे सांगून लोकांना उठवण्यात आले. याच बोटीत कार्यक्रमासाठीचे हार, गुच्छ, खाण्यासाठीची पाकीटे, पाण्याच्या बाटल्या ही भरल्या होत्या. या गदारोळात ही चौथी बोट ही अखेर निघाली. मात्र या बोटीच्या चालकास अपघाताचे वृत्त कळताच बोट वापस घ्या असे पत्रकारांनीच सांगून ती बोट गेट वे आॅफ इंडियाकडे वळवण्यास भाग पाडले.
बोट वापस निघतानाही खालच्या डेकमध्ये बसलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा वरती येऊन गर्दी करु लागल्याने ही बोटही एका बाजूला झूकू लागली. बोट चालकाने वारंवार सांगूनही कोणी ऐकत नव्हते. शेवटी पत्रकारांनी आरडाओरड केल्यानंतर हे कार्यकर्ते खाली गेले. कोणत्याही नियोजनाशिवाय, अत्यंत बेजबाबदारपणाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपण ज्यांना बोलावले होते त्यांची व्यवस्था झाली की नाही हे न पहातच मेटे ही एसीबोटीतून निघून गेले होते.
घटना घडल्यानंतर अधिकाºयांची स्पीड बोट परत आली. एकटे मेटे व काही पोलिस अधिकारी वगळता सगळे अधिकारी तेथून तात्काळ निघूनही गेले. बाकीच्या बोटी परत येण्याची वाट पाहण्याचे कष्टही कोणी घेतले नाहीत.
जयंत पाटील यांच्यामुळे अनेकांचे प्राण वाचले
अपघात घडल्याचे कळताच शेकापचे जयंत पाटील यांनी तात्काळ स्वत:ची स्पीड बोट तेथे पाठवली. ती बोट जर वेळेवर पोहोचली नसती तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर दोन हेलीकॉप्टर तेथे आले व त्यांनी बचाव कार्य सुरु केले.