राज चिंचणकर, मुंबईनाट्यसृष्टीसाठी २०१५ हे वर्ष उत्साहाचे ठरले. अनेक नवीन नाटके या वर्षात रंगभूमीवर आली आणि जुन्याजाणत्या कलावंतांसोबतच नव्या दमाच्या कलावंतांनीही त्यात भूमिका साकारल्या. प्रत्येक नव्या वर्षाची नांदी होते ती ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेच्या आगळ्या उपक्रमाने आणि २०१५ वर्ष उजाडले तेही अशाच घोषणेने! ‘सुयोग’ची घडी नव्याने व्यवस्थित बसवण्याच्या कामात गुंतलेले गोपाळ अलगेरी यांनी जानेवारीत तब्बल पाच नाटकांची घोषणा केली आणि हे वर्ष नाट्यसृष्टीसाठी बहराचे जाणार यावर शिक्कामोर्तब झाले.त्यापाठोपाठच कमलाकर सारंग यांच्या ‘कलारंग’ या नाट्यसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याची बातमी येऊन थडकली आणि बराच काळ पडद्यामागे गेलेली ही संस्था पुन्हा सक्रिय झाली. नाट्यसंस्थांच्या याच मांदियाळीत ‘भद्रकाली’ संस्थेनेही उडी घेत नाटकांचे ‘व्हिजन १००’ असा संकल्प सोडत दमदार आगेकूच सुरू ठेवली. ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या ‘आॅल टाइम हिट’ असलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाने यंदा पुन्हा एकदा रंगभूमी पाहिली. या नाटकातील त्यांची गाजलेली प्रा. बारटक्के ही भूमिका अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी रंगवत हे शिवधनुष्य पेलले. बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या तब्बल ५० वर्षे झालेल्या नाटकाने यंदा पुन्हा रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि सुवर्णमहोत्सव साजरा केला. यंदाही ‘चतुरंग’ची सवाई एकांकिका स्पर्धा जोशात पार पडली आणि यात आय.एम.सी.सी., पुणे या संस्थेची ‘बॉर्न वन’ एकांकिका सवाई ठरली.मराठी रंगभूमीवर ‘बाई’ या आदरार्थी संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी, दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे यांना मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यक्रमात ‘हाय, डॅम्स’ अशी साद घालत त्यांच्या घनिष्ठ मैत्रीला उजाळा दिला. मराठी रंगभूमीवर केवळ दामू केंकरे यांच्यामुळेच ‘बार्इंची शाळा’ भरत गेली, याचा उलगडा ‘बार्इं’नी या कार्यक्रमात केला.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यंदा थेट बालनाट्य संमेलनाच्या आखाड्यात उतरली आणि अशा प्रकारचे पहिलेच संमेलन सोलापूर येथे अलीकडेच पार पडले. बालनाट्य चळवळीत मोठे योगदान दिलेल्या कांचन सोनटक्के यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.२०१६ मध्ये ठाणे मुक्कामी आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा चौरंगी सामना रंगला. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, प्रेमानंद गज्वी, विश्वास मेहेंदळे व श्रीनिवास भणगे यांच्या या लढतीत गंगाराम गवाणकर यांच्या नावावर नाट्य परिषदेने एकमताने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या या निवडीमुळे मालवणी भाषेचाच सन्मान झाल्याची प्रतिक्रिया नाट्यसृष्टीत उमटली.२० वर्षे रंगभूमीवरून गायब झालेल्या गजेंद्र अहिरे यांनी पुनश्च नाटकांकडे मोर्चा वळवत ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक रंगभूमीवर आणले. गायक म्हणून अधिक प्रसिद्ध असलेले त्यागराज खाडिलकर यांनीही संत-महात्म्यांवर आधारित एकपात्री प्रयोग करत रंगभूमीवर एन्ट्री घेतली. इंदिरा गांधी यांची भूमिका रंगभूमीवर साकारत सुप्रिया विनोद यांनी वेगळा ठसा उमटवला. नाट्यनिर्माता म्हणून भूमिका बजावणाऱ्या राहुल भंडारे याने ‘शोधा अकबर’ या नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उडी घेतली.विविध जातकुळीची नाटके यंदा रंगभूमीवर सादर झाली. अशोक सराफ यांचे ‘लगीनघाई’, प्रशांत दामले व तेजश्री प्रधान यांचे ‘कार्टी काळजात घुसली’, जितेंद्र जोशीचे ‘दोन स्पेशल’, अरुण नलावडे व निर्मिती सावंत यांचे ‘श्री बाई समर्थ’, विक्रम गोखले व रीमा यांचे ‘के दिल अभी भरा नहीं’, अदिती सारंगधरचे ‘ग्रेसफुल’ अशा नाटकांसह सर्किट हाऊस, रानभूल, वाडा चिरेबंदी, त्या तिघांची गोष्ट, शेवग्याच्या शेंगा, जाऊ द्या ना भाई, आॅल द बेस्ट २, सेल्फी, अबीर गुलाल, तू तू मी मी, लव्हबर्ड्स या व अशा प्रकारची विविधांगी कथानके असलेल्या नाट्यकृतींनी रंगभूमी सजली. भूषण कोरगावकर यांचा ‘संगीतबारी’ हा आगळा नाट्यप्रयोगही लक्ष वेधून घेणारा ठरला. पुरस्कार : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-नट रामदास कामत, शास्त्रीय संगीत गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, बासरीवादक रोणू मुझुमदार, ज्येष्ठ हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर आदी मान्यवरांना यंदा संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारांनी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर आणि सुलभा देशपांडे यांना गौरविण्यात आले.निधन : यंदाच्या वर्षात काही ज्येष्ठ रंगकर्मींना रंगभूमी पोरकी झाली. नटवर्य भालचंद्र पेंढारकर, शाहीर कृष्णराव साबळे, अभिनेते आत्माराम भेंडे व अजय वढावकर, नाटककार प्र.ल. मयेकर, अशोक पाटोळे, गायिका वीणा चिटको यांनी यंदा काळाच्या पडद्यावरून एक्झिट घेतली. या मंडळींचे जाणे हे समस्त नाट्यसृष्टीसाठी चटका लावून गेले.
उत्साहाने भरलेले आणि भारलेले वर्ष
By admin | Published: December 24, 2015 1:56 AM