Join us

अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:41 AM

रतन टाटा यांची प्राणज्याेत मालवल्यानंतर संपूर्ण देश भावुक झाला. राजकीय नेत्यांसह उद्याेगजगत भावुक झाले आहे. सर्वांनीच भावनांना वाट माेकळी करून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रतन टाटा यांच्या निधनाची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर काही नागरिकांनी थेट टाटा ज्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत होते, त्या ठिकाणी धाव घेतली. देशाच्या लाडक्या सुपुत्राला अलविदा करण्यासाठी हजाराे नागरिकांनी अंत्ययात्रेच्या मार्गात गर्दी केली हाेती.

कॉर्पोरेट जगतापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकानेच समाजमाध्यमांचा वापर करून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. काहींनी त्यांच्या जुन्या भेटीच्या छायाचित्रे पाेस्ट करुन आठवणी जागविल्या.  अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या डीपीवर टाटा यांचा फोटो लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. विशेष म्हणजे अनेकांनी टाटा यांच्या केलेल्या कार्याचा आलेख 'क्रिएटिव्ह' पोस्ट तयार करून समाजमाध्यमांवर टाकल्या होत्या. टाटा यांची जुनी छायचित्रे, त्यांचे श्वानाविषयी असणारे प्रेम, कर्मचाऱ्याबद्दल त्यांना असणारा आदर, सर्वांना सारखीच वागणूक देणारे टाटा, त्यांच्या काळात त्यांनी टाटा समूहात सुरू केलेले नवीन व्यवसाय अशा विषयांवर समाजमाध्यमांमध्ये चर्चा होती.

रतन टाटा यांची प्राणज्याेत मालवल्यानंतर संपूर्ण देश भावुक झाला. राजकीय नेत्यांसह उद्याेगजगत भावुक झाले आहे. सर्वांनीच भावनांना वाट माेकळी करून दिली.

एका एसएमएसने नॅनो प्रकल्प नेला गुजरातेत पंतप्रधान मोदींनी सांगितली आठवण

वर्ष २०१० मध्ये गुजरातमधील सानंद येथे टाटांच्या नॅनो कार उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, नॅनो प्रकल्प पश्चिम बंगालबाहेर नेणार असल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद सुरू असताना मी त्यांना ‘वेलकम’ एवढाच एक एसएमएस पाठवला आणि प्रकल्प सानंदला आला. १ रुपयाच्या एसएमएसने २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. 

सत्तेला सत्य सांगण्याचे धैर्य होते : मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पाठविलेल्या सांत्वनपत्रात म्हटले की, रतन टाटा हे उद्योगपतीपेक्षाही अधिक काही होते. सत्तेला सत्य सांगण्याचे धैर्य त्यांच्यात होते. त्यांच्यासोबत काम करतानाच्या खूप सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत.

खरा ‘लिजंड’ गेला : अडवाणी

ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी शोकसंदेशात म्हटले की, रतन टाटा हे जिवंतपणीच दंतकथा बनलेले एक महान उद्योगपती होते. त्यांनी भारतीय उद्योगावर अमीट ठसा उमटवला आहे. मला त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य अनेकदा लाभले. त्यांच्या रूपाने उद्योग क्षेत्रातील ‘लिजंड’ आपल्याला सोडून गेला आहे. 

माझा एक प्रिय मित्र गमावला : मुकेश अंबानी

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रतन टाटा यांचा भारताचे सर्वांत प्रतिष्ठित व पराेपकारी पुत्र, असा उल्लेख केला. मी माझा एक प्रिय मित्र गमावला आहे, अशा शब्दांत अंबानी यांनी भावना व्यक्त केली.

भारताच्या भावनेला आकार दिला : गाैतम अदानी 

आधुनिक भारताच्या मार्गाला रतन टाटा यांनी नव्याने परिभाषित केले. त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि व्यापक भल्यासाठी भारताच्या भावनेला आकार दिला, अशा शब्दांमध्ये उद्याेगपती गाैतम अदानी यांनी आदरांजली वाहिली.

आदर्शांचे अनुकरण करावे : आनंद महिंद्र

रतन टाटा यांची अनुपस्थिती स्वीकार करणे अतिशय कठीण आहे. लिजेंड्स अमर असतात. आपण त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, हे आता आपले कर्तव्य आहे, अशी भावना उद्याेगपती आनंद महिंद्र यांनी व्यक्त केली.

टायटन साेडून गेला : हर्ष गाेयंका

रतन टाटा हे नैतिक नेतृत्त्व, प्रामाणिकपणा आणि पराेपकराचे प्रतीक हाेते. घड्याळाचे काटे थांबले आहेत, टायटन साेडून गेला. तुम्ही कायम स्मरणात राहाल, अशी भावना उद्याेगपती हर्ष गाेयंका यांनी व्यक्त केली.

माझे वैयक्तिक नुकसान : सुधा मूर्ती

रतन टाटा हे खऱ्या अर्थाने करुणामयी आणि लाेकांप्रति विचारशील हाेते. आयुष्यात अशी मी केवळ एकच व्यक्ती पाहिली आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी झाल्यासारखे आहे, असे खासदार सुधा मूर्ती यांनी सांगितले.

ते माझे आदर्श होते : नारायणमूर्ती

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी म्हटले की, रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. ते माझ्यासाठी नीती तत्त्वांच्या बाबतीत दिशादर्शक होते; मूल्याधिष्ठित नेतृत्वासाठी माझ्यासाठी आदर्श होते. 

दूरदृष्टी असलेले उद्याेगपती : राहुल गांधी

रतन टाटा हे दूरदृष्टी असलेले उद्योगपती होते. त्यांनी व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवला आहे. मी शोकसंवेदना व्यक्त करतो, अशी भावना काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 

औद्याेगिक क्षेत्रातील टायटन : जाेनाथन रेनाॅल्ड्स

ब्रिटनचे वाणिज्य व व्यापारमंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ते औद्योगिक क्षेत्रातील ‘टायटन’ होते. ब्रिटिश उद्योग क्षेत्रास आकार देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

कृतीतून याेगदान सिद्ध : कुमार मंगलम बिर्ला

देशाच्या आर्थिक विकासात व्यवसायाचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून आणि कौशल्यातून अधोरेखित केले. याचा फायदा केवळ कंपन्या व लाखो लोकांना झाला, असे उद्याेगपती कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी : नवीन जिंदाल 

रतन टाटा यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांची दूरदृष्टी, सामाजिक बांधीलकी, आणि कटिबद्धता ही प्रेरणादायी आहेत. त्यांचे उत्तुंग कर्तृत्व येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल.

टाटांना भारताची चिंता हाेती : सुंदर पिचाई

रतन टाटा हे असामान्य व्यवसाय आणि पराेपकारी वारसा साेडून गेले आहेत. त्यांना भारताला चांगले बनविण्याची खूप चिंता हाेती, अशी भावना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली.

सेवेची भावना सदैव प्रेरणादायी : ओम बिर्ला

देशाचा एक महान उद्योजक व समाजसेवक हरपला आहे. त्यांचा साधेपणा, दूरदृष्टी आणि सेवेची भावना सदैव प्रेरणास्रोत म्हणून काम करील, असे लाेकसभाध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

 

टॅग्स :रतन टाटाटाटा