एलएलबीच्या प्रवेश परीक्षेत सात विद्यार्थ्यांना शून्य गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:28 AM2019-05-14T02:28:09+5:302019-05-14T02:28:33+5:30
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ५ वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला.
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ५ वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. या प्रवेश परीक्षेसाठी २०,२७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८,११४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात सात विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.
५ वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा २१ एप्रिल रोजी पार पडली असून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्याबाहेरील विविध १३ ठिकाणी ही परीक्षा पार पडली होती. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियमानुसार लवकरच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.
सीईटी कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत १५० पैकी १३८, १३७, १३६ गुण मिळालेला प्रत्येकी १ विद्यार्थी आहे. तसेच १३५ गुण मिळालेले २ विद्यार्थी, १३४ गुण मिळालेले ३ विद्यार्थी आहेत. शून्य गुणाप्रमाणेच १ आणि २ गुण मिळालेलेही काही विद्यार्थी आहेत.
मुंबईमधून २ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रांच्या पर्यायाऐवजी जवळचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थी सूचना देऊनही वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. त्याच्याही अनेक तक्रारी कक्षाकडे आल्याची माहिती कक्षाकडून देण्यात आली.