Join us

बनावट आधारकार्डद्वारे मिळवला हॉकीच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 2:19 AM

औरंगाबाद येथे पार पडलेल्या नवव्या ज्युनियर पुरुष हॉकीच्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी एका खेळाडूने बनावट आधार कार्ड आणि जन्मदाखल्याचा आधार घेतल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघड झाला आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई : औरंगाबाद येथे पार पडलेल्या नवव्या ज्युनियर पुरुष हॉकीच्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी एका खेळाडूने बनावट आधार कार्ड आणि जन्मदाखल्याचा आधार घेतल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघड झाला आहे. अनिल विलास राठोड या नावाने तो मैदानात उतरला होता. यापूर्वी आठव्या चॅम्पियनशिपमध्ये तो सुनील विलास राठोड या नावाने खेळला होता. त्यामुळे या खेळाडूचे खरे नाव अनिल की सुनील याचा शोध पोलीस घेत आहेत.मुंबई हॉकी असोसिएशनचे मानस सचिव रामसिंग राठोड (६१) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथे नववी ज्युनियर पुरुष हॉकी राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुंबई हॉकी असोसिएशनतर्फे अनिल विलास राठोड नावाने खेळाडू मैदानात उतरला. १४ फेब्रुवारीला मुंबईचा संघ औरंगाबादला रवाना झाला. पण तेथे यापूर्वी आठव्या चॅम्पियनशिपमध्ये हाच खेळाडू सुनील विलास राठोड नावाने खेळला असल्याची माहिती समोर आली. तेथील परीक्षकांपर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात बनावट आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्राचा वापर करून त्याने प्रवेश मिळविल्याचे उघड झाले. हिंगोलीच्या सेनगावात राहत असल्याचे त्याच्या आधार कार्डवर नमूद केले होते. त्याला बाद करत, परीक्षकांकडून याची माहिती मुंबई असोसिएशनला देण्यात आली. त्यानंतर असोसिएशनने संबंधित खेळाडूविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :आधार कार्डगुन्हेगारी