Join us

प्रवेश प्रक्रिया अखेर सुरळीत

By admin | Published: June 23, 2017 3:49 AM

सर्व्हर डाऊन असल्याने रखडलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग गुरुवारी अखेर सुरळीत सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्व्हर डाऊन असल्याने रखडलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग गुरुवारी अखेर सुरळीत सुरू झाला. आॅनलाइन प्रवेशासाठी नव्या कंपनीला कंत्राट देऊनही आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. मुंबई शहर-उपनगरातील सर्व शाळांमध्ये बुधवारी बंद असलेली प्रवेश प्रक्रिया गुरुवारी अखेर सुरू झाल्याने शाळांमध्ये अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा दुसरा टप्पा १६ जून रोजी सुरू झाला. मात्र एक ना अनेक तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले. परिणामी, बुधवारी ही संपूर्ण प्रक्रिया एक दिवसासाठी ठप्प झाली होती. कंपनीच्या विशेष पथकासह शिक्षण उपसंचालक विभागाने ही प्रक्रिया सुरळीत केली. गुरुवारी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म (भाग १)चे ९ हजार ४५ अर्ज पडताळण्यात आले तर आॅप्शन फॉर्म(भाग २)चे १ लाख ६७ हजार ५३३ अर्ज पडताळण्यात आले.सकाळपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरळीत आहे. सायंकाळपर्यंत तब्बल २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरला होता. गेल्या वर्षी एकूण २ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. याउलट काल आॅनलाइन प्रक्रिया बंद करताना अर्जाचा भाग २ भरलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ७५ हजार होता. त्यात आज झपाट्याने वाढ झाली असून, तो १ लाख ७० हजारपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला आहे. २७ जूनपर्यंत प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता आहे. तरीही गरज भासल्यास आॅनलाइन अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यावर विचार केला जाईल, असे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सर्व्हर दुरुस्तपहिला आॅनलाइन अर्ज भरते वेळी काहीच समस्या झालेली नाही. दुसरा अर्ज भरताना दोन ते तीन दिवस सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरता आले नाहीत. पण आज सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली नाही. त्यामुळे बऱ्याच मुलांचे दुसरे फॉर्म भरण्यात आले, अशी प्रतिक्रिया मालाड येथील महाराणी सईबाई विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अमिता राऊत यांनी दिली.

पडताळणीला अजूनही अडचणसर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाली होती, त्याचे निराकरण झाले आहे. परंतु, आॅनलाइन प्रक्रियेतील जात प्रमाणपत्र पडताळणीत अजूनही अडचण येत आहे, असे कांदिवलीच्या ज्ञानगंगा स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अनिल जगदाळे यांनी सांगितले.संकेतस्थळाची कासवगतीसर्व्हर डाऊनची समस्या दूर झाली असली तरी अर्ज भरताना संकेतस्थळ ‘कासवगती’ने सुरू होते. त्यामुळे सायबर कॅफेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागले. त्यानंतर संथगतीने ही प्रक्रिया सुरू होती.- मिताली मटकर, विद्यार्थिनी, अनुदत्त विद्यालय, कांदिवलीपहाटेच अर्ज भरलाप्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतील हे लक्षात घेऊन पुन्हा संकेतस्थळावर लोड येईल या भीतीने पहाटे ४ वाजता अर्ज भरला.- निमिष वर्दम, विद्यार्थी, आॅक्सफर्ड पब्लिक स्कूल, चारकोप, कांदिवली