फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना सुरुवात
By admin | Published: September 8, 2016 06:04 AM2016-09-08T06:04:55+5:302016-09-08T06:04:55+5:30
दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशास बुधवारी सुरुवात झाली.
मुंबई : दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशास बुधवारी सुरुवात झाली. मात्र, या विशेष फेरीसाठी फ्रेशर्स म्हणजेच जून महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने, ठरावीक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
या आधी फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या एकूण ९ आॅनलाइन फेऱ्या घेण्यात आल्या, तरीही नाराज विद्यार्थ्यांची संख्या संपत नसल्याचे चित्र आहे. नाराज विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून चूक झाल्यानेच ही वेळ आल्याचे लक्षात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, घरानजीकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश हवा असल्याचा पालकांचा हट्ट होता. शिवाय या फेरीतही विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी केली. याउलट फेरपरीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यास बुधवारी सुरुवात झाली. फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, म्हणून ही विशेष फेरी आहे. फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी या आधीच ९ फेऱ्या घेण्यात आल्या असून, त्यांना पुरेशी संधीही मिळालेली आहे. परिणामी, फेरपरीक्षेतील उत्तीर्ण व एटीकेटी मिळालेल्यांचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून या फेरीमध्ये फ्रेशर्सला संधी देण्यात आलेली नाही.(प्रतिनिधी)