विद्यापीठाच्या परीक्षा विभागात घुसखोरी
By admin | Published: January 4, 2016 02:38 AM2016-01-04T02:38:01+5:302016-01-04T02:38:01+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील परीक्षा विभागात विद्यापीठाचा कर्मचारी नसताना एका व्यक्तीने घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील परीक्षा विभागात विद्यापीठाचा कर्मचारी नसताना एका व्यक्तीने घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतरही विद्यापीठाने या प्रकरणातील व्यक्तीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कुलगुरूंकडे केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस आला आहे. यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागाकडे दुर्लक्ष केल्याचे पुन्हा समोर आले आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचा कर्मचारी नसलेल्या एका व्यक्तीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जाऊन, तेथील रजिस्टरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. या वेळी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन, त्याला पोलीस ठाण्यात हजर केले, पण त्यानंतरही या व्यक्तीवर कारवाई झालेली नाही.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतरही विद्यापीठाशी संबंध नसताना, एक व्यक्ती थेट परीक्षा विभागात गेलीच कशी, याची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनविसेचे उपाध्यक्ष संतोष धोत्रे यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.