मुंबई- मुलाला शेवटचा व्हिडीओ कॉल करत घाटकोपरच्या एका उद्योजकाने वांद्रे वरळी सिलिंकवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. भावेश सेठ (५६) असे या व्यक्तीचे नाव असून, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे मिळालेल्या सुसाइड नोटवरून स्पष्ट झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील सेठ यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे. एका अज्ञात कारमधून लिफ्ट मागून ते वांद्रे येथील सी-लिंकजवळ आले. त्यांनी आपली कार सी-लिंकवर बिघडल्याचे संबंधित कारचालकाला सांगितले. त्या कारमधून वरळीच्या दिशेने सी-लिंकवरआल्यानंतर त्यांनी दुपारी ३:११ च्या सुमारास, त्यांच्या मुलाला एक व्हिडीओ कॉल केला आणि त्याला सांगितले की, मी वांद्रे वरळी सी लिंकवरून आत्महत्या करत आहे. त्यानंतर त्यांनी समुद्रात उडी मारली.
कोळीवाड्यातील रहिवाशांनी सेठना सी लिंकवरून उडी मारताना पाहिले. तेव्हा प्रेम सोस्ते, बाबू शिवचरण, मोनू रॉबिन, अन्वर अली यांनी बोट घेऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलिसांना तपासादरम्यान शेठ यांनी ज्या कारमधून लिफ्ट घेतली होती, त्या कारमध्ये त्यांची सुसाइड नोट सापडली.