Join us

अंकशास्त्राचा फ़ायदा घेण्यासाठी उद्योजक रतन टाटा यांच्या वाहन क्रमांकाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:15 AM

वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलवाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखललोकमत ...

वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंकशास्त्राचा फ़ायदा घेण्यासाठी उद्योजक रतन टाटा यांच्या वाहन क्रमांकाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार वाहतूक पोलिसांच्या चौकशीत मंगळवारी उघड झाला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थेट रतन टाटा यांना ई-चलनाचे संदेश धडकू लागल्याने, पथकाने तपास सुरू केला. तपासात तो क्रमांक रतन टाटा यांच्या वाहनांवरील नसून मे. नरेंद्र फॉर्वड्रेस कंपनीच्या संचालिकेच्या वाहनावरील असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध बनावट वाहन क्रमांकाचा वापर करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी परिसरात वाहनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रतन टाटा यांना ई-चलन धाडण्यात आले. यात, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांना संशय आल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप फणसे, पोलीस हवालदार अजीज शेख यांच्यासह अधिक तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनांचा शोध घेत चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत हे वाहन मे. नरेंद्र फॉर्वड्रेस कंपनीच्या संचालिकेच्या मालकीचे असल्याचे उघड झाले. यात अंकशास्त्राचा फ़ायदा घेण्यासाठी मूळ वाहन क्रमांक बदलून या क्रमांकाचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात संचालिकेविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच रतन टाटा यांना पाठविण्यात आलेले ई-चलन संबंधित संचालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी तपास पथकाला ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच कोणीही अशा प्रकारे बनावट वाहन क्रमांकाचा वापर करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.