Join us

पालिका शाळेतून तयार होणार उद्याचे उद्योजक; कौशल्य प्रशिक्षणासाठी २८.४५ कोटींची तरतूद  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:45 AM

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई :

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय सद्यःस्थितीत रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर २४९ पालिकेच्या २२ शाळांमधील नववी आणि दहावीतील ४१ हजार  ७७४ विद्यार्थ्यांकरिता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या निविदा प्रक्रिया येत्या एक ते २ आठवड्यात निघणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

महापालिका शिक्षण विभागातील अनेक विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव शाळाबाह्य व्हावे लागत असते. या मुलांना कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण नसल्याने अनेकदा त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्याचा कौशल्य विकास विभाग आणि पालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कौशल्य प्रशिक्षण देणार आहे. ज्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवून प्रशिक्षण देण्यात येईल त्यांचे मुंबई पब्लिक स्कूल आणि कौशल्य केंद्रे असे नामकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय जगन्नाथ शंकर शेठ शाळेमध्ये मुख्य कौशल्य केंद्र उभारून हा उपक्रम राबविणाऱ्या शाळांचा समन्वय साधण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना पारंपरिक शाखांमधील शिक्षण न देता, आवड असलेल्या विविध व्यवसाय आणि कौशल्यांचे प्रशिक्षण येथे दिले जाईल, ज्यांचा उपयोग त्यांना रोजगारासाठी होऊ शकणार आहे. पालिका शाळांतील कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पालिका शिक्षण अर्थसंकल्पात २८.४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

२ हजारपेक्षा जास्त अभ्यासक्रमांमधून आवश्यक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम निवडण्याचा महापालिकेकडे पर्यायमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत शाळेतील शिक्षकांना कौशल्य प्रशिक्षणनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून निश्चित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमानुसार शालेय विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल.