लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: उद्योजकांनी कधीही संकटांना घाबरू नये, त्यांनी उद्याचा विचार करावा, असे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी सांगितले. दादर येथील शिवाजी मंदिरात शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या "प्रीत खाद्यपरंपरेची" या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शेफ विवेक ताम्हाणे, उद्योजिका मीनल मोहाडीकर उपस्थित होते.कामत पुढे म्हणाले की, आईकडून प्रेरणा घेऊन तुषार जे शिकले, त्या अनुभवांनी त्यांचे जीवन समृद्ध तर झालेच, पण तो ठेवा दुसऱ्यांनाही मिळावा, यासाठी त्यांची चाललेली धडपडही जाणविली. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारे तुषारचे पुस्तक म्हणूनच वेगळे आहे. ते त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित करून आईला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.एखादे पुस्तक निर्माण करणे म्हणजे मुलाला जन्म देणे असते. तुषार यांच्या पुस्तकात त्यांनी पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची जोड देत, जे पदार्थ सांगितले आहेत, ते पुरुषांना सहज करता येण्यासारखे आहेत, असे शेफ विवेक ताम्हाणे म्हणाले. तर, दोन वर्षांची मेहनत घेऊन निर्माण झालेल्या या पुस्तकामुळे उद्योजकतेचे बीज अनेकांमध्ये रुजेल, असा विश्वास उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी व्यक्त केला. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या विक्रीतून उभा राहणारा संपूर्ण निधी हा शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती शेफ तुषार देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाचे निवेदन उत्तरा मोने यांनी केले.
उद्योजकांनी संकटाला घाबरू नये - विठ्ठल कामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:58 AM