Join us  

उद्योजकता हाच सध्याचा जागतिक धर्म

By admin | Published: February 01, 2016 2:46 AM

उद्योजकता हाच सध्याचा जागतिक धर्म आहे. तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी प्रेरणा सर्वात महत्त्वाची असते. यशस्वी उद्योजकांच्या कथा सांगून त्यांना प्रेरित केले,

संकेत सातोपे, मुंबईउद्योजकता हाच सध्याचा जागतिक धर्म आहे. तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी प्रेरणा सर्वात महत्त्वाची असते. यशस्वी उद्योजकांच्या कथा सांगून त्यांना प्रेरित केले, तर ते निश्चितच उद्योग उभारणीकडे वळतात. भारतात असे तरुण नवउद्योजक निर्माण करण्याचा आणि त्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ते साहाय्य करण्याची आमची तयारी आहे, असे एलेना डोनेट्स यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एलेना डोनेट्स इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठाच्या ‘स्टार्टाऊ’ या नवउद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सध्या त्या मुंबई दौऱ्यावर असून, इस्रायली दूतावासाच्या माध्यमातून मुंबईतील आयआयटी, वेलिंगकर्ससारख्या उच्चशिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता प्रशिक्षणाबाबत व्याख्याने देत आहेत. भारत-इस्रायल या दोस्त राष्ट्रांमधील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, उद्योजकांमध्ये आदान-प्रदान व्हावे आणि उद्योजकांची जागतिक साखळी निर्माण होण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे एलेना यांनी सांगितले. ‘भारतातील आयआयटीसारख्या संस्था उद्योजकता प्रशिक्षणासंदर्भात चांगले काम करीत आहेत. त्यातून नक्कीच चांगले उद्योजक तयार होऊ शकतील. विद्यार्थ्यांना त्यांचे उद्योग क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्या वाटेने धीराने चालण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ठिकठिकाणी व्याख्यानातून मी हेच काम करीत आहे,’ असे त्या म्हणाल्या. एलेना म्हणाल्या, ‘अनेक तरुणांमध्ये उद्योग सुरू करण्याची ऊर्मी असते, परंतु त्यांना त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तेलअवीव विद्यापीठातील आमचे केंद्र हे मार्गदर्शन देण्याचेच काम करते. विद्यार्थ्यांना आम्ही तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि अन्य आवश्यक साहाय्य पुरवितो. त्यातून नवे उद्योजक घडवितो. आमच्या विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे ३० हजार विद्यार्थांमधून आम्ही प्रत्येक बॅचला केवळ ४० विद्यार्थी या केंद्रातील प्रशिक्षणासाठी निवडतो. ही निवडप्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. त्यानंतर या ४० विद्यार्थ्यांना चार महिने उद्योजकतेचे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येते. त्यातील तीन महिने विद्यार्थ्यांच्या प्रात्येक्षिक कार्यशाळाही घेण्यात येतात. त्यानंतर स्वत:च्या अभिनव कल्पना घेऊन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्याला अन्य आवश्यक साहाय्यही केले जाते. या प्रशिक्षण वर्गांतून आम्ही अनेक यशस्वी उद्योजक तयार केले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर आमच्या केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या एका तरुणीने छोटेखानी सॉफ्टवेअर उद्योग सुरू केला. दीड वर्षांत तिने १०२ मिलियन डॉलर्सचा व्यावसाय केला आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्वत:चे कार्यालयही थाटले, अशा अनेक यशोगाथा सांगता येतील.’