गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:45 PM2023-10-26T12:45:10+5:302023-10-26T12:45:42+5:30

मराठा आंदोलक आणि सदावर्ते असा वाद रंगला आहे. गाड्यांची तोडफोड करणारे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. या घटनेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

Entry of famous criminal lawyers Satish Manshinde against Gunaratna Sadavarte! The case of the Maratha protesters will be fought without taking a single penny | गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज सकाळीच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड मराठा आदोलकांनी केली आहे. यावरून मराठा आंदोलक आणि सदावर्ते असा वाद रंगला आहे. गाड्यांची तोडफोड करणारे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. या घटनेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

यावरून सदावर्ते वि. जरांगे पाटील आरोप प्रत्यारोप सुरु असताना प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मराठा आंदोलकांची केस ते एक रुपयाची फी न घेता लढणार आहेत. यामुळे आता सदावर्ते वि. मानशिंदे अशी लढाई न्यायालयात पहायला मिळणार आहे. 

सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जातात.  मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात बंद असलेला अभिनेता संजय दत्तच वकीलपत्र त्यांनी घेतले आणि ते चर्चेत आले. राम जेठमालानी यांच्याकडे देखील त्यांनी खूप वर्षे काम केलेले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केसेस ते लढवितात. 

आज सकाळी काय झाले...
सकाळी सहाच्या सुमारास मुंबईतील पऱळ भागातील वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांसमोरच हा प्रकार झाला. यावरून सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटलांच्या शांततामय आंदोलनाची हिच व्याख्या आहे का असा सवाल करत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. दुसरीकडे जरांगे पाटलांनी सदावर्तेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.  

मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनलने हे दाखवलं. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही, असे सदावर्ते म्हणाले होते. महाराष्ट्रातील या घटनांची सुरुवात ही पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली. ती माझ्या घरावर आलीय. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले. त्या जरांगेंना अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. 

यावर जरांगे पाटलांनी सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे.  या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. 
 

Web Title: Entry of famous criminal lawyers Satish Manshinde against Gunaratna Sadavarte! The case of the Maratha protesters will be fought without taking a single penny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.