Join us

कोविड घोटाळ्यात आयकरची एन्ट्री; पाच शहरांत १२ ठिकाणी कंत्राटदारांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 9:56 AM

कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १४० कोटी रुपयांचे कंत्राट जारी केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारलेल्या कोविड केंद्रात झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात आयकर विभागाने एन्ट्री केली असून, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, गुजरात व प्रयागराज अशा पाच ठिकाणी तब्बल डझनभर कार्यालयांवर छापेमारी केली. 

कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १४० कोटी रुपयांचे कंत्राट जारी केले होते. मात्र, या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी यामधील अर्धी रक्कमही खर्च झाली नसल्याचे दिसून आले व ती अर्धी रक्कमही हडप केल्याची विभागाची माहिती आहे. या अनुषंगाने प्रामुख्याने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर छापेमारी झाली आहे. ऑक्सिजनच्या या पुरवठ्याचे कंत्राट मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या छेडा नावाच्या एका कंत्राटदाराला मिळाल्याची माहिती असून, छेडा यांच्या कंपनीने हे कंत्राट कागदनिर्मितीत कार्यरत असलेल्या कंपनीला दिल्याचे समजते. 

कंपन्यांचा आपसांत काय संबंध?या कंपनीने दिल्लीस्थित एका कंपनीकडून ऑक्सिजन व आवश्यक ती सामुग्री खरेदी करत कागदनिर्मिती करणाऱ्या कंपनीला बिलाची आकारणी केली. संबंधित कंपनीने छेडा यांच्या कंपनीकडे वाढीव दराने बिल आकारणी केली व तेथून महापालिकेने पैसे जारी केल्याचे समजते. मात्र, या कंपन्यांचा आपापसांत काय व कसा संबंध आहे, याचा तपास आता आयकर विभाग करत आहे. 

टॅग्स :इन्कम टॅक्स