प्रवेश प्रक्रिया संपली

By admin | Published: September 14, 2016 04:35 AM2016-09-14T04:35:36+5:302016-09-14T04:35:36+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना

The entry process is over | प्रवेश प्रक्रिया संपली

प्रवेश प्रक्रिया संपली

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागण्याआधीच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली आहे.
फेरपरीक्षेत ३२ हजार ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विद्यापीठाने सुरू केलेली प्रवेश पूर्व आॅनलाइन प्रक्रियाही शनिवारी, १० सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर आता आयडॉल, मुक्त विद्यापीठ आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गुणवत्ता असतानाही प्रवेश प्रक्रिया संपल्याने, अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना मुकावे लागले आहे. केवळ शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, विद्यार्थी नियमित प्रवेशापासून वंचित राहिल्याचा रोष पालकांनी व्यक्त केला आहे.
या आधी बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला, तर तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी, औषध निर्माता, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद अशा विविध अभ्यासक्रमांच्या पदवीच्या जागा १५ आॅगस्टपूर्वीच भरल्या आहेत. त्यामुळे अधिक गुण मिळवून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न अर्धवट राहिले आहे. मुळात शासनाने प्रवेश प्रक्रियेआधी निकाल लावणे अपेक्षित होते. चुकीच्या धोरणामुळे एकीकडे मुंबईसह राज्यातील अनेक अभियांत्रिकीसह औषध निर्माता, एमबीए आणि इतर अभ्यासक्रमांच्या हजारो जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्ता असतानाही प्रवेश मिळू शकलेला नाही. या परिस्थितीसाठी शिक्षण विभागाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप ‘बुक्टो’चे उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब साळवे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The entry process is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.