पर्यावरण विभाग गुदमरलेला, मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 09:59 AM2024-01-06T09:59:09+5:302024-01-06T10:00:18+5:30

नव्याने पद निर्मितीचा प्रशासनासमोर प्रस्ताव.

Environment department is suffocating how will mumbai be pollution free? | पर्यावरण विभाग गुदमरलेला, मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी?

पर्यावरण विभाग गुदमरलेला, मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी?

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेचा पर्यावरण विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.  मात्र पालिकेच्या पर्यावरण विभागाची भिस्त एकाच अधिकाऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. 

पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे एक क्लार्क असून, अन्य स्टाफ घनकचरा व्यवस्थापन विभागातील आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणारा पर्यावरण विभागच कामाच्या तणावाखाली असल्याने मुंबईप्रदूषणमुक्त होणार कशी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाकडून जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडण्यात आला आहे. 

 पर्यावरण विभागात मनुष्यबळाची कमतरता असून, किमान प्रत्येक वाॅर्डात एक तरी सब इंजिनिअर द्या, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पर्यावरण विभागाने पाठविला आहे.

 मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

 बांधकामाच्या ठिकाणी नियमावली जारी केली आहे.

 हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत;  मात्र पर्यावरण विभागातच मनुष्यबळ कमी असल्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय करावे? असा प्रश्न आता पर्यावरण विभागाला सतावत आहे.

 पर्यावरण विभागाला मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 

पर्यावरण विभागात कर्मचारी नाही :

पालिकेत २००५ मध्ये उपायुक्त पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार झाले. तर २०१६ पर्यंत पालिकेचा पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग एकाच उपायुक्तांच्या माध्यमातून काम करत होते.  मात्र २०१६ मध्ये या विभागाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आले. मात्र दोन्ही विभागांतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी पर्यावरण विभागाला एकही कर्मचारी देण्यात आला नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्टाफ आणायचा कुठून?

सफरने मुंबईत ठिकठिकाणी प्रदूषणमापन यंत्र बसवली असून, ती सुरू आहेत की त्यात बिघाड झालाय हे तपासण्यासाठी पर्यावरण विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. कारण मनुष्यबळ नसल्याने स्टाफ आणायचा कुठून? असा सवाल आता पर्यावरण विभागाला सतावत आहे.

Web Title: Environment department is suffocating how will mumbai be pollution free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.