Join us

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आरेची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 7:12 PM

जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

मुंबई : गेल्या सोमवारी संध्याकाळी न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनीच्या मागील नॅशनल पार्कच्या डोंगराला आग लागली होती. या आगीत येथील 3 ते 4 किमीच्या पट्यातील वनसंपत्ती, झाडे भस्मसात झाली. या पार्श्वभूमीवर आज दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. या आगीत किती झाडे भस्मसात झाली, किती झाडांचे बुंधे आहेत, याची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे त्यांनी वनखाते, पालिका प्रशासन यांना यावेळी दिले.आगीमुळे झालेला काळा ठिक्कर झालेला भकास डोंगर आणि विशेष करून आगीत भक्ष्यस्थानी पडलेली सागाची आणि जांभळाची झाडे त्यांनी पाहिली. येथे आग लागली नसून ती लावण्यात असल्याचे प्राथमिक पाहणीतून त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे येथील जागेवर असलेल्या मॅनेजरवर नव्हे तर मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी पोलिसांना दिले. चौकशीअंती जर कोणी दोषी आढळल्यास, तो कितीही मोठा असला तरी त्यावर शासन कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथे दरवर्षी आगी लावून वनसंपत्ती नष्ट केली जाते. येथील झाडे आधी कापली आणि मग त्यांना आगी लावण्यात येतात असा आरोप यावेळी स्थानिकांनी केला. यावेळी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू, स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, शाखाप्रमुख संपत मोरे व संदीप जाधव तसेच स्थानिक उपस्थित होते. 

टॅग्स :रामदास कदमआरेआग