Join us

पावसाळ्यापूर्वी उभारणार भूमिगत टाक्या, हिंदमाता येथील कामाचा पर्यावरणमंत्र्यांकडून आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 9:22 AM

Mumbai News: हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. 

 मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात तुंबणाऱ्या दादर पूर्व, हिंदमाता परिसरात भूमिगत टाक्या तयार करून पाणी साठवण्याचा प्रयोग महापालिका करणार आहे. यासाठी प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राउंड येथे भूमिगत टाक्या तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी या कामाची स्वतः पाहणी केली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.  या मोठ्या भूमिगत टाक्या कमीतकमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवू शकतील. मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठी भरती असल्यास याचाविशेष उपयोग होऊन या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा पालिकेला विश्वास वाटत आहे.टोकियो शहरात पावसाचे पाणी साठविण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. गेल्यावर्षी याबाबत माहिती घेतल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक जपानमध्ये जाऊन आले होते. तसेच जपानमधील तज्ज्ञांची एक टीम मुंबईत येऊन याबाबत मार्गदर्शन करणार होती. मात्र, मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर हा प्रयोग बारगळला. परंतु, आदित्य ठाकरे हे स्वतः हा प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानुसार पहिला प्रयोग हिंदमाता परिसरात होणार आहे. या कामाची ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी नगरसेविका ऊर्मिला पांचाळ, अतिरिक्त आयुक्त वेलारसू उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईपाऊसआदित्य ठाकरे