मुंबई : मुंबईला वातावरणीय बदल सक्षम बनविण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विविध भागधारकांशी चर्चा करण्यात येत आहे. यामध्ये सूचना, हरकती, शिफारशी नोंदविता याव्यात, यासाठी नागरिकांनीदेखील पूर्व नोंदणी करून दूरदृश्य प्रणालीद्वारे होत असलेल्या ऑनलाइन चर्चासत्रांमध्ये सहभागी व्हावे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर वातावरण बदलाशी निगडित सूचना, हरकती, शिफारशी पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
वातावरण संदर्भातील तज्ज्ञ व भागधारकांशी सल्लामसलत करून आराखडा बनविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. कोविडची स्थिती लक्षात घेता, दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाइन चर्चासत्रे आयोजित करून तज्ज्ञांसह नागरिकांशी चर्चा करण्यात येत आहे. या चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. चर्चासत्रे सुरू झाली असून प्रारंभीच्या दोन चर्चासत्रांचा अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आराखड्याबाबत तज्ज्ञ व्यक्ती तसेच नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी संकेतस्थळाच्या माध्यमातून २० सप्टेंबरपर्यंत पाठवू शकतात. आराखडाअंतर्गत संकल्पना आधारीत उपाय हे नोव्हेंबर २०२१पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषद आयोजन कालावधीच्या आसपास तयार होण्याची शक्यता आहे.