पर्यावरणमंत्री कदम यांचे घूमजाव
By admin | Published: April 13, 2016 02:11 AM2016-04-13T02:11:59+5:302016-04-13T02:11:59+5:30
वालधुनी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या जीन्स कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा करणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वी घूमजाव केले आहे
- सदानंद नाईक, उल्हासनगर
वालधुनी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या जीन्स कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा करणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वी घूमजाव केले आहे. जीन्स कारखान्यांचे प्रदूषण रोखण्याकरिता महापालिकेनेच प्रक्रिया केंद्र उभारावे, असे आदेश देऊन कदम यांनी जीन्स कारखान्यांची सुटका केली व महापालिका प्रशासनाला अडकवले.
कदम यांनी या कारखान्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने या कारखान्यांच्या मालकांनी कदम यांची समजूत काढण्याकरिता पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी गळ घातली होती. त्यानुसार शिंदे,आमदार बालाजी किणीकर यांनी कदम यांची भेट घेतली. त्यानंतर पर्यावरणमंत्र्यांचे नवे आदेश आले.
उल्हासनगरातील कॅम्प नं-५ व ४ भागात ५०० पेक्षा जास्त जीन्स कारखाने आहेत. कारखान्यातील विषारी सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडून नदी प्रदूषित करीत आहेत. पर्यावरणमंत्री कदम यांनी गेल्या महिन्यात आयुक्तांसह प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जीन्स कारखान्यांवर कारवाई करून १० दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. शहरातील ९० टक्के जीन्स कारखाने महापौर अपेक्षा पाटील यांच्या प्रभागात असल्याची माहिती पालिकेने बैठकीत दिली. बहुंताश जीन्स कारखान्यांनी अवैध नळजोडण्या घेतल्या असून ५०० फुटांपर्यंत बोअरवेल खणल्या आहेत.