Join us

उत्सवातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश, जोगेश्‍वरीतील गणेशोत्सव मंडळ जपतेय सामाजिक बांधिलकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 11:31 PM

गणेशोत्सवाबरोबरच एक सामाजिक संदेश द्यायचा, तरुण पिढीचे प्रबोधन करायचे, या संकल्पनेतून जोगेश्‍वरी येथील लक्ष्मण नगर गणेशोत्सव मंडळानं दरवर्षी यंदाही आगळावेगळ्या गणपतीची मूर्ती साकारली आहे.  

मुंबई- सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. त्यात अनेक गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्ती विराजमान झाल्यानं भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जोगेश्वरीतल्या लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळानंही दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवादरम्यान नवनवे उपक्रम राबवले आहेत. गणेशोत्सवाबरोबरच एक सामाजिक संदेश द्यायचा, तरुण पिढीचे प्रबोधन करायचे, या संकल्पनेतून जोगेश्‍वरी येथील लक्ष्मण नगर गणेशोत्सव मंडळानं दरवर्षी यंदाही आगळावेगळ्या गणपतीची मूर्ती साकारली आहे.  

अशाच एका संकल्पनेतून या मंडळाने या वर्षी टिश्यूपेपरपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पर्यावरणाची हानी लक्षात घेता या मंडळाने यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे या भागातील महिलांनी वर्षभर आपल्या जमाखर्चातून पै अन् पै जमा करून ही मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त गणेशमूर्तीच नाही, तर मंडप सजावटीसाठीही केवळ कापड, कागद आणि प्लायवूडचा वापर करून होता होईल तितके पर्यावरण संवर्धन राखण्याचा प्रयत्न लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळाने केला आहे. 

मागील वर्षीही मंडळाकडून शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मंडळाचे हे 34 वे वर्षं असून, या मंडळाची संपूर्ण धुरा  युवावर्गाकडे आहे. सामाजिक बांधिलकी जपतानाच आपल्या सण-उत्सवांचे हेतू आणि उद्देश घराघरात आणि माणसामाणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात येते. दरवर्षी शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने मंडळ गणेशोत्सव साजरा करत असल्याने या मंडळाला विविध संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवगणेश विसर्जनगणपती