Join us

पवईमधील पर्यावरणस्नेही सनग्लोरी सोसायटी

By admin | Published: June 02, 2017 6:12 AM

कडुलिंब, चाफा, बदाम, गुलमोहर इत्यादी वनस्पती आणि फुलझाडांची लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट आणि पाण्याचे नियोजन,

सागर नेवरेकर/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कडुलिंब, चाफा, बदाम, गुलमोहर इत्यादी वनस्पती आणि फुलझाडांची लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट आणि पाण्याचे नियोजन, सुका कचरा आणि ओला कचऱ्याचे विभाजन करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे; असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवत पवई येथील सनग्लोरी को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने आपले वेगळेपण जपले असून, मुंबईमधील इतर सोसायट्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.पवई येथील सनग्लोरी को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी ही रहेजा विहार कॉम्प्लेक्समधील ३५ सोसायट्यांपैकी एक सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये ७७ फ्लॅटस् आहेत. ३ विंग्स्ला प्रत्येकी ३ लॉबी आहेत. इमारत ७ मजली असून, १९९८ साली इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. सोसायटीच्या समितीमध्ये ८ सभासद आहेत, त्यात ३ महिलांचा समावेश आहे. सोसायटीचे वैशिष्ट्य ही की पाण्याचे नियोजन उत्तमरीत्या केले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते. पाणी वाचवण्यासाठी सोसायटीमध्ये नोटीस बोर्डद्वारे जनजागृती केली जाते. सोसायटीमध्ये कधीही पाण्याचा टँकर मागवला जात नाही. लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसाठी खेळाचे कार्यक्रम ठेवले जातात.सोसायटीमध्ये प्रत्येक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. दीपावली, ख्रिसमस आणि नवरात्रौत्सव या सणांसाठी सोसायटीच्या संपूर्ण इमारतीला रोशणाई केली जाते. ही रोशणाई पाहण्यासाठी परिसरातील लोकांची रात्रीच्या वेळेस गर्दी होते. सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देले जाते. ज्येष्ठांना मदतीचा हात दिला जातो. सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी स्विमिंग पूल, कॉमन क्लब हाउस, योगासने, व्यायामशाळा, बॅटमिंटन आणि टेनिस कोर्ट इत्यादी सुविधा रहिवाशांना पुरविल्या जातात. तसेच गेट-टु-गेदरसाठी हॉलदेखील बांधण्यात आला आहे. सोसायटीच्या परिसरात तीन उद्याने आहेत. ज्येष्ठांसाठी लाफ्टर क्लब हा उपक्रम येथे राबविला जातो.सोसायटीमध्ये वृक्ष संवर्धनाची मोहीम चालवली जाते. या मोहिमेंतर्गत अडुळसा, कडुलिंब, चाफा, बदाम, गुलमोहर इत्यादी वनस्पती आणि फुलझाडे लावली गेली आहेत. सोसायटीमध्ये एखाद्या वेळेस भांडण-तंटे किंवा वादविवाद झाला तर समितीद्वारे वाद सोडविला जातो. सोसायटीमध्ये स्वच्छतेला महत्त्व देताना दिवसातून ३ वेळा इमारतीची साफसफाई केली जाते. सुका कचरा आणि ओला कचरा अशा प्रकारे विभाजन करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. सोसायटीच्या परिसरात मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. तसेच ३ सफाई कामगार, १ सुपरवायझर, १ व्यवस्थापक आणि १ प्लम्बर हे सोसायटीची अहोरात्र सेवा करत असतात. सोसायटीची खरी सुरक्षा १५ कॅमेरे करीत आहेत. येथे सगळ्यांना समान न्याय आणि हक्क मिळतो. प्रत्येक धर्माच्या, सणांच्या शुभेच्छा नोटीस फलकांवर दिल्या जातात. सोसायटीचा पूर्ण कारभार हा पारदर्शक स्वरूपाचा आहे.