Join us

आरे कॉलनीतील मेट्रो भवनाला पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:00 AM

आरेत मेट्रो भवन ही ३२ मजली इमारत बांधली जाणार असून, या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या १४ मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे.

मुंबई : आरे कॉलनीमध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडला विरोध होत असताना आरेमध्ये एमएमआरडीएने मेट्रो भवनाचे काम सुरू ठेवल्याने पर्यावरणवाद्यांनी मेट्रो भवनाला विरोध कायम ठेवला आहे. नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) मेट्रो भवनाचे काम सुरू आहे. एमएमआरडीएची बीकेसीमध्ये स्वत:ची जागा असतानाही मेट्रो भवनासाठी कारशेडची जागा का, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.आरेत मेट्रो भवन ही ३२ मजली इमारत बांधली जाणार असून, या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या १४ मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. यातील एक मार्ग सध्या पूर्ण झाला असून उर्वरित १३ मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबईत ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विस्तारले जाणार आहेत. परंतु आरे कॉलनी हे इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याने या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याने कारशेडच नाहीतर, मेट्रो भवन अथवा अन्य कोणत्याही प्रकल्पाचे बांधकाम आरेमध्ये करता येणार नसल्याचे आरे कन्झर्वेटिव्ह ग्रुपचे सदस्य झोरू बाथेना यांनी सांगितले. तसेच कारशेडप्रमाणे आमचा मेट्रो भवनाच्या कामालाही विरोध राहणार आहे़ आरेमध्ये मेट्रो भवनाच्या कामापूर्वीचे मातीपरीक्षणाचे काम सुरू आहे.एमएमआरडीएची स्वत:ची बीकेसीमध्ये जागा आहे. आरे वगळता मुंबईमध्ये कुठेही मेट्रो भवन उभारता येऊ शकते़ आरेला बीकेसी करण्याचा आधीच्या सरकाचा उद्देश असल्याने त्यांनी आरेमध्ये मेट्रो भवनाच्या कामाला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.आरेत बांधकाम करण्यासाठी जितक्या जागेवर परवानगी दिली आहे, तितक्याच जागेवर बांधकाम करावे, त्या क्षेत्रासभोवतालच्या नैसर्गिक संपत्तीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही; तसेच अनधिकृत बांधकाम करू नये. जसजसे बांधकाम पुढे जाईल त्या प्रत्येक टप्प्याची माहिती आरे डेअरी विभागाला द्यावी, डेअरी विभागाचे अधिकारी वेळोवेळी बांधकामाचा आढावा घेतील आणि त्यांना प्राधिकरणाने सहकार्य करावे असे मेट्रो रेलेने याआधी स्पष्ट केले आहे़

टॅग्स :मुंबई