समाज वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा निर्धार; ३० संघटनांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:17 PM2023-06-07T13:17:35+5:302023-06-07T13:18:29+5:30
विकासाच्या नावाखाली लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांचा पर्यावरणासह समाज मनावर दुष्परिणाम होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विकासाच्या नावाखाली लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांचा पर्यावरणासह समाज मनावर दुष्परिणाम होत आहे. या संदर्भात एकत्र येत आवाज अधिक बुलंद करण्यासाठी पर्यावरण आंदोलनातील जवळपास ३० संघटना आणि कार्यकर्त्यांची सोमवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी विविध मागण्या करीत निसर्ग, जीवसृष्टी, माणूस आणि समाज वाचविण्यासाठी संघटित होण्याचा निर्धार करण्यात आला.
मुंबईच्या हवेतील प्रदूषण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. सिमेंट काँक्रीटच्या विकासकामांमुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने श्वसनाच्या व्याधींनी मुंबईकर त्रस्त आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण मे महिना मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात प्रचंड उष्णतेची लाट आली आणि जनसामान्यांचे हाल झाले. पर्यावरणीय बदलाचा दृश्य परिणाम दिसू लागला आहे. ते आपल्याला आता भोगावे लागत असल्याचे मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणात गेली काही वर्षे अनेक विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. या विरोधात कोकणी माणूस, सामान्य कष्टकरी नागरिक लढत आहेत.
या सर्वांना एकत्र करून ठोस कृती कार्यक्रम आखण्यासाठी सोमवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ३० संस्था संघटनांची बैठक मुंबईत झाली. यावेळी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी पर्यावरणीयदृष्ट्या घातक प्रकल्प तातडीने रद्द करावेत, कार्यकर्त्यांवरील केसेस, गुन्हे, नोटिसा मागे घ्याव्यात, प्रकल्प स्थानिकांच्या संमतीशिवाय लागू करू नये अशा मागण्या केल्या.
या संघटनांचा सहभाग
या बैठकीला आरे पर्यावरण बचाव, सेव्ह आरे, आदिवासी हक्क संवर्धन समिती, बारसू रिफायनरी विरोधी संघटना, बेबक, भूमी सेना, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, धारावी बेट बचाव समिती, जनस्वास्थ्य अभियान, कष्टकरी संघटना, पर्यावरण संवर्धन समिती, श्रमिक मुक्ती संघटना अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.