आरेतील प्रस्तावित प्रकल्पांना पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:00 AM2019-12-13T03:00:24+5:302019-12-13T03:00:41+5:30
आरेमध्ये मेट्रो भवनाच्या कामापूर्वीचे माती परीक्षणाचे काम सुरू आहे.
मुंबई : आरे कॉलनीमध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडच्या कामावर बंदी आली, मात्र आरेमध्येमेट्रो भवनाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह आरेमध्ये भविष्यात विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. आरेतील मेट्रोभवनाच्या कामाला करत आरेमध्ये भविष्यामध्ये होणा-या प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध करण्यात आला आहे.
आरेमध्ये मेट्रो भवनाच्या कामापूर्वीचे माती परीक्षणाचे काम सुरू आहे. भविष्यामध्ये आरेत अॅनीमल कन्झर्वेशन सेंटर, एसआरए प्रकल्प, आरटीओ कार्यालय, भुयारी मार्ग असे काही प्रकल्प येणार असल्याचे आधीच्या सरकारने स्पष्ट केले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यामध्ये यावर विस्तृत अहवाल मागवला होता़ अद्याप हा अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचे आरे कर्न्वेटीव्ह ग्रुपचे सदस्य झोरू बाथेना यांनी स्पष्ट केले. आमचा या सर्व प्रस्तावित प्रकल्पांना विरोध आहे़ आरे हे इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याने या भागामध्ये कोणताही प्रकल्प येता कामा नये अन्यथा या भागातील पर्यावरणावर याचा अनिष्ठ परिणाम होऊ शकतो़ जंगल नष्ट करणे सोपे आहे मात्र हे वाचवणे कठीण आहे़ आमचा आरेतील प्रस्तावित सर्वच प्रकल्पांना विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरेत मेट्रो भवन ही ३२ मजली इमारत बांधली जाणार असून, या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या १४ मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. यातील एक मार्ग सध्या पूर्ण झाला असून उर्वरित १३ मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबईत ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विस्तारले जाणार आहेत. परंतु आरे कॉलनी हे इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याने या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. तसेच मेट्रोभवनाप्रमाणे आमचा आरेतील प्रस्तावित प्रकल्पांनाही विरोध कायम राहणार आहे़
एमएमआरडीएची स्वत:ची बीकेसीमध्ये जागा आहे. आरे वगळता मुंबईमध्ये कुठेही मेट्रो भवन उभारता येऊ शकते़ तरीही आरेमध्येच मेट्रोभवन का उभारले जात आहे, असा सवालही पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.
आरे कॉलनी हे इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याने मेट्रो भवन, कारशेड अथवा अन्य कोणत्याही प्रकल्पाचे बांधकाम आरेमध्ये करता येणार नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील प्रकल्पांच्या कामांना पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम राहणार आहे़