Join us

Save Aarey: आरेच्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध; आज सात ठिकाणी होणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 9:09 AM

Save Aarey Colony: आरेच्या वृक्ष तोडीला चर्चगेट, शिवाजी पार्क, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी आज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई :मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड बांधण्यासाठी २ हजार २३८ झाडे बाधित ठरत होती, ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आला होता. या प्रस्तावास गुरुवारी मंजुरी देण्यात आली, मात्र आरेमधील झाडे तोडण्यास फ्रायडे फॉर फ्युचर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी आणि संस्थांनी सुद्धा तीव्र विरोध दर्शविला आहे.

शासनाने नागरिकांचा विश्वासघात करून आणि आरे विनाशासंदर्भातील सर्व आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही आपली निराशा व्यक्त करण्यासाठी संप करत आहोत. आपल्यालाही असेच वाटत असल्यास, आपल्या जवळच्या संपामध्ये सामील व्हा. यासारख्या कृती हवामान संकटात भर घालत आहेत, असा आरोप करत आरेच्या वृक्ष तोडीला चर्चगेट, शिवाजी पार्क, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी आज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत.

आरेत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे भविष्यात येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे भविष्यातील हवामानातील न्यायासाठी सरकारला विचारणा करण्यासाठी आम्ही आज विविध सात ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती फ्रायडे फॉर फ्युचर या संस्थेच्या पूजा डोमडीया यांनी लोकमतशी बोलताना दिली. यंग जनरेशनचा हा मोठा ग्रुप असून त्यांच्या आंदोलनाचा हा 26 वा आठवडा आहे. सेव्ह आरे संस्थेला हा तरुणांचा ग्रुप येथील 2328 झाडे वाचवण्यासाठी मोठे सहकार्य करत आहे.

काल संध्याकाळपासूनच या आंदोलनाची जोरदार तयारी फ्रायडे फॉर फ्युचर,सेव्ह आरे व इतर पर्यावरणवादी संस्थांनी सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून नागरिकांना व पर्यावरण प्रेमींना  तात्पुरते व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले असून त्यांना या आंदोलनाचा अचूक तपशील दिला जाणार आहे. तर या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पुनर्वापर केलेले साहित्य वापरुन आपले स्वतःचे पोस्टर्स बनवा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. आपल्याला जर ही 2328 झाडे वाचवायची असतील, असे जर मनापासून  वाटत असल्यास, आपल्या जवळच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आपला या वृक्ष तोडीला तीव्र विरोध दर्शवा असे आवाहन पूजा डोमाडीया यांनी केले आहे. 

आरेच्या 2328 वृक्षतोडीमुळे 27 आदिवासी पाड्यांचे नुकसान होणार आहे. पर्यावरण नष्ट करण्यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न हाणून पाडू. त्यासाठी न्यायालयात दाद मागणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कॅसँड्रा नासरेथ यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :आरेआंदोलन