पर्यावरणपूरक विसर्जन : गणेशमूर्तींच्या विसर्जित पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:03+5:302021-09-19T04:06:03+5:30
मुंबई : मुंबईसह राज्यभरात रविवारी दहा दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनानंतरसाठी सुधारित मार्गदर्शक ...
मुंबई : मुंबईसह राज्यभरात रविवारी दहा दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनानंतरसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या पाणवठ्यामध्ये होईल तेथे पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.
ज्या पाणवठ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जित होतील त्या पाण्यातील ऑक्सिजन, रंग, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड अशा अनेक घटकांचे परीक्षण केले जाईल. अशा ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा केले जातील. त्याचे विश्लेषण केले जाईल. प्रयोगशाळात त्याची तपासणी केली जाईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
समुद्र आणि ज्या तलावात मूर्ती विसर्जित केल्या जातील तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील. सर्वच ठिकाणचे नमुने घेण्याऐवजी ठराविक ठिकाणचे नमुने घेतले जातील. कृत्रिम तलावांचा मात्र यामध्ये समावेश नसेल. मुळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी काम केले जात आहे. पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नये याकरिता या घटकांना प्राधान्य दिले जात आहे. शिवाय यावर्षी बहुतांश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित केल्या आहेत. शिवाय बहुतांश मूर्ती शाडूच्या मातीच्या आहेत. याव्यतिरिक्त निर्माल्य गोळा करण्यासाठी पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. त्यामुळे फार प्रदूषण होणार नाही. गणेशोत्सव, विसर्जन पर्यावरणपूरक होईल, असा आशावाददेखील मंडळाने व्यक्त केला आहे.