Join us

पर्यावरणपूरक विसर्जन : तुळशीचे रोपटे व वाळू देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

मुंबई : महापालिकेतर्फे विसर्जन व्यवस्थेची जी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्या नियमावलीला मुंबईकर नागरिकांनी प्रतिसाद देत, घरगुती ...

मुंबई : महापालिकेतर्फे विसर्जन व्यवस्थेची जी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्या नियमावलीला मुंबईकर नागरिकांनी प्रतिसाद देत, घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन साधेपणाने व शांततेत कृत्रिम तलावांमधील स्वच्छ पाण्यामध्ये केले. विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना विसर्जनानंतर तुळशीचे रोपटे व वाळू देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

महाराष्ट्र हायस्कूल मैदान, डिलाईल रोड, जांबोरी मैदान, वरळी, मोहन रावले उद्यान, टी.जे. रोड, शिवडी येथील कृत्रिम तलावात होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेची किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी पाहणी करून, महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबईत सर्वच विसर्जन ठिकाणी कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक अंतर पाळून, गंगाजल, गुलाब पाकळी टाकून विधिवत विसर्जन करून पावित्र्य कायम राखण्यात आले. महापालिकेतर्फे सर्वच विसर्जन व्यवस्थेच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.