उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; शिंदेंनी केलेल्या '५० खोक्यां'च्या आरोपांची चौकशी सुरू, ITचीही एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:41 AM2024-02-27T11:41:05+5:302024-02-27T11:45:14+5:30
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत आता आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Shivsena Uddhav Thackeray ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. तसंच "५० खोके, एकदम ओके" अशी घोषणाबाजी करत मविआ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमच्याकडून ५० खोके घेतले, असा आरोप केला. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षाविरोधात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आता आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
"निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय दिल्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षनिधीतून ५० कोटी रुपये काढल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कर कोण भरत आहे, याबाबतही आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाकडे माहिती मागितली आहे," असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Economic Offences Wing (EOW) begins probe after Shiv Sena (Eknath Shinde faction) complained against Shiv Sena (UBT faction) that Shiv Sena (UBT faction) withdrew Rs 50 crores from party fund even after the Election Commission declared Shinde faction as the real Shiv Sena. EOW…
— ANI (@ANI) February 27, 2024
एकनाथ शिंदे महाअधिवेशनात काय म्हणाले होते?
कोल्हापूर इथं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "नुकतंच सभेत कोणीतरी म्हणालं की उद्धव ठाकरे यांना खोके नाही तर कंटनेर लागतात. या गोष्टीचा सर्वांत मोठा साक्षीदार मीच असू शकतो. याची कल्पना दीपक केसरकर, तानाजी सावंत, उदय सामंत यांना आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष आम्हाला दिला. त्यानंतर ठाकरेंच्या गटाकडून एक पत्र आलं. शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये आम्हाला द्या. मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने याबाबत अधिक माहिती दिली. मी एका क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेच्या खात्यावरील ५० कोटी रुपये तातडीने दिले. त्यांना बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे विचार नको आहेत. ते आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करतात. मग आम्हाला ५० खोके मागताना त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती," असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला होता.