Join us  

कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 8:55 PM

आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई - कोरोना काळात ऑक्सिजन प्लँटशी संबंधित कामे वेळेत पूर्ण न करता महापालिकेची ६ कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेने कंत्राटदार रोमिन छेडाला अटक केली आहे. गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने छेडाची ८ तास चौकशी केली होती. कामे पूर्ण नसतानाही ती पूर्ण झाल्याची भासवून ६ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा मेसर्स हायवे कंपनीच्या रोमिन छेडावर करण्यात आला आहे.  आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेंग्विनच्या कंत्राटमुळे वादग्रस्त ठरलेल्या मेसर्स हायवे कंपनीची पात्रता नसतानाही या कंपनीला पालिकेची ९ रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही. मात्र, २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बनावट पत्राचा वापर केल्याचेही नमूद आहे. ही कंपनी ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ असल्याने तिला कंत्राट दिले जात असल्याचे आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा संबंधितांचा लेखाजोखा तपास करत आहे.यापूर्वी कोरोनाकाळातील विविध घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंदवत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरे