Join us

एपीएमसीत अतिक्रमणांचे पेव

By admin | Published: August 08, 2015 10:20 PM

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. नियम धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे.

- नामदेव मोरे, नवी मुंबई

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. नियम धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे. प्रशासनाने अभय दिल्यामुळेच मार्केटमध्ये धार्मिक स्थळांसह, कामगार, वाहतूकदारांची कार्यालये व इतर अनेक बांधकामे बेकायदेशीरपणे उभी राहिली आहेत. नवी मुंबईमधील अतिक्रमणांचा विषय अनेक दिवसांपासून गाजत आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली २०१३ नंतरची घरेही पाडण्यास सुरुवात झाली आहे. दिघामधील बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. शहरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची कारवाई जोरदार सुरू असताना महापालिकेचे एपीएमसीतील अतिक्रमणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून याठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. येथील पाचही मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी गाळ्यांच्या वर एक मजला वाढविला आहे. बांधकाम करताना बाजार समिती व महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. व्यापाऱ्यांना वाढीव चटईक्षेत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु हा विषय न्यायालयात आहे. परंतु त्याआधीच अनेकांनी बांधकामे केली आहेत. धान्य मार्केटमध्येही काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सर्वाधिक बांधकाम फळ मार्केटमध्येभाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर एक व काहींनी दोन मजले वाढविले आहेत. काही ठिकाणी कामगारांना वापरण्यासाठी खोल्या काढल्या आहेत. व्यापाऱ्यांनी वातानुकूलित कार्यालये थाटली आहेत. मार्केटमधील लिलावगृहाचे बांधकाम करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर मोठ्याप्रमाणात बांधकाम केले आहे. काही गाळ्यांमध्ये कँटीन सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मार्केटमध्ये पान विक्रेत्यांपासून किरकोळ फळविक्री करणाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटला आहे. मोकळ्या जागेवर विविध सामाजिक संस्थांनी जागा अडवून पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.प्रशासनाचे अभय : बाजार समिती प्रशासनानेच आतापर्यंत अतिक्रमणास अभय दिले आहे. मार्केटच्या सर्व गेटवर सुरक्षारक्षक असताना बांधकामाचे साहित्य आतमध्ये येऊच शकत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून व्यापाऱ्यांना बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. यामुळेच मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. बाजार समिती बकाल : अतिक्रमणांमुळे बाजार समिती बकाल झाली आहे. फळ मार्केटमध्ये गाळ्यांवर वाढीव मजला बांधला आहेच, शिवाय छतावर तंबू ठोकून विनापरवाना मुक्काम करणाऱ्या कामगारांना जागा उपलब्ध करून दिली आहे. बाजार समितीमधील बांधकामाचा शिल्लक एफएसआय व्यापाऱ्यांनी वापरल्याने सर्व मार्केट बकाल झाली आहेत. अतिक्रमण रोखण्याच्या सूचना बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सचिव शिवाजी पहिनकर यांनी कोणत्याही मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. फळ मार्केटमधील बेकायदेशीर व्यायामशाळेवरही कारवाई केली आहे. परंतु यापूर्वी झालेल्या अतिक्रमणांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेने दिल्या नोटिसा पालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, यापूर्वी एपीएमसीतील अतिक्रमणांना नोटिसा दिल्या होत्या. प्रशासनासही याविषयी माहिती दिली होती. वास्तविक बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.