सर्व विद्यार्थ्यांना समान लाभ; बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या योजनांमध्ये समानता आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:10 AM2023-10-20T06:10:11+5:302023-10-20T06:10:36+5:30
योजनांमध्ये समानता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांतर्फे विविध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता येऊन सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना समान लाभ मिळणार आहे. या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येसही मान्यता देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात. सध्या या संस्थांच्या विविध योजनांचे निकष आणि अटी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे लाभही वेगवेगळे होते. काही ठिकाणी शिष्यवृत्तीच्या रकमेत तफावत होती, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतींमध्ये तफावत आहे.
बांधकाम कामगारांच्या योजनेत सुधारणा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच कामगार नियमांत सुधारणा सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला
राज्य सहकारी बँकेत होणार शासकीय बँकिंग व्यवहार
शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सहकारी बँकेचे नक्त मूल्य चार हजार कोटींपेक्षा जास्त असून, सतत ५ वर्षे नफ्यात राहिलेली आहे. लेखापरीक्षणातदेखील सतत ५ वर्षे अ वर्ग दर्जा असून, भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
राज्यात चार धर्मादाय सहआयुक्त
राज्यात चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. धर्मादाय संघटनेतील नाशिक, पुणे, नागपूर व नांदेड येथील कार्यालयांत प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार धर्मादाय सहआयुक्त व ४ लघुलेखक (उच्च श्रेणी) अशी एकूण आठ नियमित पदे निर्माण करण्यास व ४ मनुष्यबळाच्या (बहुद्देशीय गट-ड कुशल कर्मचारी) सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यात येतील.
कोराडीत वीज प्रकल्पास मान्यता
नागपूर जिल्ह्यातील कामटी तालुक्यातील कोराडी येथे २ x ६६० मेगावॉट क्षमतेच्या कोळशावर आधारित सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता देण्यात आली. महानिर्मिती कंपनीच्या जुन्या बंद होणाऱ्या १२५० मेगावॉट क्षमतेच्या संचाच्या बदल्यात हा १३२० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी १० हजार ६२५ कोटी खर्च येणार आहे.
अहमदनगरमध्ये नवीन पशुवैद्यक महाविद्यालय
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहाता तालुक्यातील
शिर्डी येथील मौ. सावळी विहीर खुर्द येथे सुमारे ७५ एकर जमिनीवर हे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होईल. यासाठी एकूण
३४६ कोटींचा खर्च येईल.