Join us

समतेसाठी पुरुषभान गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:09 AM

फाशीने माणूस संपेल विकृतीचे काय? मुंबई, महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या घटनांनी निर्भया प्रकरणाची आठवण करून दिली. सात वर्ष तीन महिन्यांनंतर ...

फाशीने माणूस संपेल विकृतीचे काय? मुंबई, महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या घटनांनी निर्भया प्रकरणाची आठवण करून दिली. सात वर्ष तीन महिन्यांनंतर निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिली. उशिरा मिळालेला न्याय हादेखील अन्याय आहे. कारण पीडित परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत रोज मरतो. पण न्याय मिळतो का? महिला अत्याचारविरोधी कायदे कडक असतानाही अत्याचाराच्या घटना घडतच आहेत.

...........................

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील एकूण स्त्रियांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. मोठ्या प्रमाणात स्त्रियांना आपल्या कुटुंबातील आणि बाहेरील पुरुषांकडून नियमितपणे होणाऱ्या शारीरिक हल्ल्यांना, मानसिक छळाला, प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागते. वडील, भाऊ, नवरा, मित्र, ओळखी, अनोळखी अशांकडून देशांत दररोज १३३ बलात्कार होतात. गेल्या सहा महिन्यांतील पोलीस ठाण्यातील नोंद आकडेवारी २८ हजारांहून अधिक आहे. नोंद नसलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी किती असेल?

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, जगातील स्त्रियांच्या हिंसेचे प्रमाण हे एका साथीच्या रोगासारखे ही एक सामाजिक विकृती. आज समाजातील अर्धा टक्का घटक असलेला पुरुष या विकृतीचा रोगी बनलेला आहे आणि या विकृतीला समाजातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला बळी पडत आहेत. खरं तर ही पुरुषांसाठी लाजिरवाणी बाब आहे. यामुळे ही विकृती रोखण्याचे काम कोण करणार, हा प्रश्न या समाजातील अखिल पुरुषांसमोर आ वासून उभा आहे. आज गुन्ह्यांसाठी थेट फाशीची शिक्षा असतानादेखील पुरुषांना असा गुन्हा काय? करावासा वाटतो? यानिमित्ताने एक वेगळाच प्रश्न मला पडतो की, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतरही हा प्रश्न संपणार आहे का? स्त्री एकटी जगू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषही एकटा जगू शकत नाही. खरं तर याला काही अपवाद असूही शकतात. स्त्री पुरुषावर अवलंबून असते, असे वारंवार सांगितले जाते. याचे कारण काय? तर, स्त्रीच्या मनातील भय. या भयापोटीच ती पुरुषावर कायम अवलंबून असते, असे म्हटले जाते. खरे तर या समाजात अशाही काही स्त्रिया आहेत ज्या प्रत्यक्ष वाघालाही घाबरत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, कोणत्याही स्त्रीला वाघापेक्षा पुरुष जास्त भयानक वाटतो.

महिलांच्या एका वर्गाला वाटते, अशा नराधमांना फाशी दिली पाहिजे, तर असाही महिलांचा वर्ग आहे जो फाशीच्या शिक्षेचे समर्थन करीत नाही. मुळात समाजातील पुरुषवर्गासोबत संवाद साधला गेलेला नाही की, त्याला हा बलात्कार, अत्याचार का करावासा वाटतो? समाजात स्त्री आणि पुरुष जडणघडण लहानपणापासूनच वेगवेगळ्या पद्धतीने होते. आधुनिक जगतातही समाजात मुलगा आणि मुलगी भेद सर्रास असतो. मुलाने कसे, मुलीने कसे वागावे? या सगळ्याचे नियम आधीचे ठरवले आहेत. या नियमांच्या विरूध्द एखादी मुलगी वागताना दिसली की, तिला पुरुषी अहंकाराला बळी पडावे लागते.

स्त्रियांवर अत्याचार करण्याची जी विकृत मनोवृत्ती आहे, तिचा संबंध स्त्री-पुरुष यांच्या संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे.

स्त्रीचे देहापलीकडे जाऊन एक स्वतंत्र अस्तित्व असते, बुद्धिमत्ता असते, व्यक्तिमत्त्च असते, ती कर्तव्यदक्ष असते, हे मानायला आजही पुरुष तयार नाहीत. तिची शारीरिक सुंदरता एवढेच काय ते स्वीकारले जाते.

बलात्कार, अत्याचार आणि हत्या अशा प्रकरणात कितीतरी पुरुष आहेत, की ज्यांना पश्चाताप, कृत्याचा गिल्ट वाटत नाही. पुरुषसत्तेला आव्हान देणाऱ्या स्त्रीला किंवा माणसाला धडा शिकवायचा, याच मानसिकतेतून गुन्हे घडत असतात.

मुलगी वयात आल्यानंतर तिच्याशी संवाद साधला जातो, अगदी तसाच संवाद मुलांशी साधला जात नाही, हे वास्तव आहे. पालक आपल्या मुलांसमोर लिंग, सेक्स असे शब्द उच्चारतदेखील नाहीत. या गोष्टींबाबत गुप्तता पाळली जाते. मर्दानगी संदर्भातील विकृत संकल्पना बदलायच्या असतील तर पालकांचा मुलांशी संवाद गरजेचा आहे. घडलेल्या घटना या जातीयवादी हिंसक मानसिकतेची उदाहरणे आहेत. संविधानाच्या ५१ (क) कलमामध्ये नागरिक कर्तव्य. स्त्रीला उणेपणा वाटेल असे कोणतेही कृत्य नागरिकांनी करू नये, स्त्रीला आत्मसन्माने जगण्याचा अधिकार विचार स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून आचरणात आणावा लागेल. कायदा ही घटना घडल्यानंतरची प्रक्रिया आहे. पण घटना घडूच नयेत, यासाठी स्त्री-पुरुष समतेसाठी पुरुषभान, समाजभान या दिशेने वाटचाल गरजेची आहे.

- वर्षा विद्या विलास

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)