मुंबई- राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, आता पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्या आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
दरम्यान, राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नागपुरात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली तर पुणे जिल्ह्यात ४ जणांचा बळी गेला आहे. खान्देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.