मुंबईत होणार पाण्याचे समन्यायी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:43 AM2019-06-21T01:43:21+5:302019-06-21T01:43:42+5:30
गढूळ पाण्याच्या तक्रारी २४ तासांत सोडविण्याचे आदेश
मुंबई : मुंबईतील समन्यायी पाणीवाटपाचा अहवाल राज्य सरकारने तयार केला असून तो लवकरच मुंबई महापालिकेकडे सोपविला जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील काही भागांत जास्त दाबाने तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. हा प्रकार टाळून प्रत्येक वॉर्डात समसमान, पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक झोनमधील जलवाहिन्यांवर फ्लोमीटर बसविले जातील. तसेच पाण्याचा दाब मोजण्यासाठी दाबमापक यंत्र बसविली जातील, असेही सागर यांनी सांगितले.
मुंबईतील २५८ झोनमधील प्रत्येक विभागात फ्लोमीटर आणि दाबमापक यंत्रे बसविण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली. फ्लोमीटर आणि दाबमापक यंत्रामुळे कोणत्या भागात किती प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यात होतो याची नोंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच गढूळ पाण्याबाबतच्या सर्व तक्रारींचा २४ तासांच्या आत निपटारा करावा, नवीन नळ जोडणीसाठी आलेल्या अर्जांची नोंद घेऊन ३० दिवसांच्या आत ते निकाली लावावे, असे आदेश महापालिकेला देण्यात आल्याचेही सागर यांनी सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील अपुरी कर्मचारी संख्या पाहता त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासही महापालिकेला सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांनी कुलाबा परिसरात वर्षानुवर्षे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची लक्षवेधी उपस्थित केली होती. कुलाब्याची १३ लाख निवासी लोकसंख्या आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला कायमस्वरूपी कमी दाबाने ५० टक्के पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला. कुलाब्यातल्या झोपडपट्टीलाच नव्हे तर टॉवरनाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती त्यांनी सभागृहासमोर मांडली.
अहवालानुसारच पाणीपुरवठा
मुंबईत कुठल्या भागात किती पाण्याची गरज आहे याची पडताळणी करण्यासाठी समन्यायी पाणीपुरवठ्यासाठी समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. या समितीचा अहवाल तयार असून तो महापालिकेला दिला जाईल. त्यानुसारच मुंबईत सर्वत्र पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती सागर यांनी दिली.