मुंबई : मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांत पसरलेला कोरोना आता ग्रामीण भागातदेखील पसरू लागला आहे. परिणामी, गावागावांत पसरणाऱ्या कोरोनाला थोपविण्यासह कोरोना रुग्णांना स्थानिक स्तरावरच उपचार घेता यावेत म्हणून मुंबईतल्या काही स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. अशाच एका मुंबईस्थित असोसिएशन ऑफ सोशल बियाँड बाँड्रीज या संस्थेने शहापूरलगतच्या गावांत दोन रुग्णालये उभारली आहेत. त्यात आता कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने यातील एका रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. शिवाय येथे एक रुग्णवाहिकादेखील प्रदान करण्यात आली आहे.
आदिवासी भागात वेळेवर उपचार मिळावेत म्हणून रुग्णालय, कोविड सेंटर आणि रुग्णवाहिका ही सेवा देण्यात आली आहे. कोविड सेंटरमध्ये चार बेड असून, स्थानिक डॉक्टर सेवा देत आहेत. जलखन, जरंडी अशी या दोन गावांची नावे असून, आरोग्यविषयक सर्व सेवा येथे देण्यात आल्या आहेत. संस्थेने हे काम करताना कोणाकडेही मदत मागितलेली नाही. संस्थेच्या सदस्यांनी पैसा उभा केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेण्यात आलेली नाही. केवळ निधी उभा करत रुग्णालय, कोविड सेंटर आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे. आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांसह राज खिमावत, संकेत महेता आणि प्रीत लखानी यांनी मदत केल्याचे संस्थापक सागर जैन यांनी सांगितले. दरम्यान, आदिवासी विभागात राहणाऱ्या लोकांना रोजगार निर्मिती नसल्याने माफक दरात आरोग्य सेवा देण्यात आल्या आहेत. सध्या गावातील लोकांनाच येथील आरोग्य सेवेचा लाभ दिला जात आहे. आरोग्य सेवेवर ताण येऊ नये म्हणून सेवा गावापुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.