एरंगळ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सुमारे बारा-तेरा किलोमीटर अंतरावरील समुद्रकिनार पट्टीजवळ वसलेलं आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एरंगळ येथील बारर्वीची जत्रा भरते. मुंबईसह विरार, वसई, बदलापूर, पालघर या विविध भागातून एरंगळ बीचच्या बारवीच्या प्रसिद्ध जत्रेला विविध जाती धर्माचे लाखो भाविक या यात्रेला एकत्र येतात. राष्ट्रीय एकोपा व सर्वधर्म स्नेहभाव जोपासणारी अशी ही येथील प्रसिद्ध जत्रा आहे.
एरंगळ गावात इ. स. १५७५ साली बांधलेलं संत बोनाव्हेंचर पुरातन चर्च आहे. दर्याच्या वा-यावादळाशी सामना करत गेली जवळपास ४४८ वर्ष हे चर्च आजही एरंगळ समुद्रकिनारी दिमाखात उभे आहे. या चर्चमध्ये संत बोनाव्हेंचर यांची मोठी मूर्ती असून हे संत म्हणजे तेराव्या शतकात इटली देशात होऊन गेलेला एक मठाधिपती, गाढा विद्वान व तत्त्ववेत्ता. या महापंडिताने लिहिलेले धर्मग्रंथ ख्रिस्ती परंपरेत आठशे वर्षानंतरही आजही अभ्यासले जात आहेत. संत बोनाव्हेंचर हे एरंगळ गावचे आश्रयदाते व संरक्षणकर्ते आहेत,अशी या गावकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे.
बेस्ट उपक्रमाने उद्या दि, ८ जानेवारीच्या एरंगळ जत्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६६ जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जत्रेला ये – जा करणाऱ्या नागरिकांना बेस्ट बसमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागामार्फत दरवर्षी ‘एरंगळ जत्रे’साठी जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येते.
या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट परिवहनतर्फे मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ आणि मार्वे बीच ते मढ जेट्टी, मार्वे बीच ते एरंगळ दरम्यान बसमार्ग क्र. २७१, तसेच बोरीवली बसस्थानक (प.) ते मढ जेट्टी दरम्यान बसमार्ग क्र. २६९ अशा एकूण सकाळी २२ आणि संध्याकाळी ४२ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या जादा बसगाड्या सकाळी ६ पासून चालविण्यात येणार आहेत. तसेच, या बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
सदर बसगाड्यांमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज मालवणी आगार इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. बस निरीक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
सुसज्ज पर्यटन स्थळ निर्माण करामालाड पश्चिमेकडील किनार विशाल समुद्र किनारे सुसज्ज आहे. एरंगळ बीचची जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. एरंगळ किनारपट्टी जवळ असलेले अक्सा बीच आणि मार्वे बीच देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. या बीचेसला भेट देण्यासाठी दूरवरुन मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. जर सरकारने ऑरेंज बीचच्या एमटीडीसी अंतर्गत भूखंडावर पुरेशा सुविधांनी सुसज्ज पुरेशी पर्यटन केंद्रे तयार केली, तर सरकारला आर्थिक फायदा होईल आणि सुसज्ज पर्यटन केंद्र निर्माण होईल. तसेच या तीन समुद्र किनारी राहणाऱ्या स्थानिकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. त्यामुळे येथील समुद्रकिनारपट्टीचा पर्यटन केंद्र म्हणून विकास झाल्यास त्याचा लाभ पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना मिळू शकेल अशी मागणी आपण २०१५ पासून सातत्याने करत असल्याचे उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले. आपण या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.