सात वर्षांनी उघडला इरॅासचा दरवाजा
By संजय घावरे | Published: February 9, 2024 09:07 PM2024-02-09T21:07:41+5:302024-02-09T21:08:39+5:30
९० वर्षे जुने सिनेमागृह ३०५ आसनक्षमतेसह नव्या रूपात रसिकांच्या सेवेत.
मुंबई - मागील सात वर्षांपासून बंद असलेले इरॅास सिनेमागृह नव्या रूप-रंगात रसिकांच्या सेवेत रुजू झाले आहे. शाहिद कपूर आणि कृती सॅनोन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने इरॉसचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
आजवर इरॉसच्या रिओपनिंगचे बरेच मुहूर्त काढण्यात आले, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सिनेमागृह खुले होऊ शकले नाही. सात वर्षांपूर्वी 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' या चित्रपटानंतर इरॉसमध्ये कोणत्याही चित्रपटाचा शो झाला नव्हता. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फायटर' या हिंदी चित्रपटाने इरॉस सुरू करण्याचे ठरले. 'फायटर'चा प्रीमियर शो इरॉसमध्ये दाखवण्यात येणार होता, पण मराठा मोर्चाच्या वातावरणामुळे प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही टळला. अखेर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने इरॉस पुन्हा सुरू झाले आहे. या आयकॉनिक सिनेमागृहात पीव्हीआर आयनॅाक्सने आयमॅक्स सुरू केले आहे, जे ३०५ आसनांचे आहे. पूर्वी १२०० आसनक्षमतेचे असलेले हे सिंगल स्क्रीन थिएटर दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले असून नवीन इरॉसमध्ये बाल्कनी नाही. मल्टिप्लेक्सप्रमाणे एकच समान सिनेमाहॉल करण्यात आला आहे. आता या सिनेमागृहात मल्टिप्लेक्सप्रमाणे वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
इरॉसच्या भव्य लॉबीमध्ये प्रवेश केल्यावर तिथली सजावट लक्ष वेधून घेते. काळ्या आणि पांढऱ्या इटालियन मार्बल्सने सुशोभित केलेल्या वर्तुळाकार लॉबीची सजावट करताना आयकॉनिक सिनेमागृहातील ऐतिहासिक खुणा जतन करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. सिनेमागृहातील आसने इतर पीव्हीआर आयनॉक्स सिनेमागृहांप्रमाणे आरामदायी आहेत. दोन्ही बाजूला दोन षटकोनी लिफ्ट आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याही आहेत. हा जिना बॉक्स आणि बाल्कनीऐवजी पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेकडे नेतो. पूर्वी सिनेमागृहात प्रवेश केल्यावर थेट हॉलमध्ये जाता येत होते, पण आता थिएटर दुसऱ्या मजल्यावर आहे. इरॉसला नूतनीकरणाचा साज चढवताना इतिहासाच्या खुणाही जपण्याचे काम करण्यात आले आहे. नूतनीकरणानंतर इरॉसमध्ये पहिला शो पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक इथले वातावरण आणि बदल पाहून खूप खुश झाले होते. त्यांचा आनंद चेहऱ्यावर तसेच त्यांच्या बोलण्यातूनही जाणवत होता.