Join us

विलेपार्ले व टी २ टर्मिनल समोरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर संरक्षक छत्री उभारा; वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: March 17, 2023 6:35 PM

२०१४ साली विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता.

मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ टर्मिनल समोर आणि  विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर छत्र नाही. परिणामी सदर दोन्ही पुतळे ३६५ दिवस ऊन आणि पावसाचा सामना करत दिमाखात उभे असून देशी व परदेशी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पक्ष्यांची विष्ठा आणि निसर्गाच्या विळख्यापासून संरक्षण करण्याची मागणी अनेकवेळा तत्कालीन सरकारकडे करून सुद्धा आजमितीस छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर छत्र उभारले नाही!

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि पूजणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांची राज्य सरकारने दखल घ्यावी.आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ टर्मिनल समोर आणि  विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर छत्र उभारावे अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे. लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये यापूर्वी सदर वृत्त सातत्याने मांडले आहे.

२०१४ साली विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. तर २०१२ पासून छत्र विना उभा असलेला अंधेरी पूर्व मरोळ वेअर हाऊस येथील पुतळा  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ टर्मिनल समोर स्थलांतरित करण्यात आला होता.तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेदि,१२ मार्च २०२० रोजी अनावरण करण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेत संग्रहालय उभारू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारले जाईल अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली होती. तर अंधेरी पूर्व विधांसभेव्हे दिवंगत आमदार रमेश लटके यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेत २०१५ साली नागपूर हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची मागणी केली होती. मात्र आजतागायत विलेपार्ले येथील संग्रहालय पूर्णत्वास आलेले नाही आणि आणि या दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारले नाही अशी खंत अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दररोज पुष्पहार घालण्यात यावा आणि पक्ष्यांची विष्ठा आणि निसर्गाच्या विळख्यापासून संरक्षण करण्यासाठी या दोन्ही पुतळ्यावर छत्र उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.