वसई : अर्नाळा किल्ला गावाच्या पूर्वेस समुद्रात रविवारी आलेल्या उधाणामध्ये ५ झोपड्या कोसळल्या तर ७ घरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ही घरे लाटांच्या तडाख्यात कोणत्याही क्षणी पुन्हा सापडतील अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे.२ दिवसापासून अर्नाळा समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत असून या लाटांचा तडाखा किल्ला गावाच्या पूर्वेस समुद्रकिनारी असलेल्या अनेक घरांना बसत आहे. रविवारी या लाटांनी जगदीश वामन मेहेर, नरेश हरी मेहेर, अनंत हरी मेहेर, अशोक काशिनाथ मेहेर, बाळनाथ जगु मेहेर या ५ जणांच्या झोपड्या गिळंकृत केल्या. तर नरेश राजाराम मेहेर, पांडुरंग जीवन मेहेर, प्रकाश नारायण म्हात्रे, रघुनाथ गोविंद म्हात्रे, अरूण वामन मेहेर, हसुमती दत्तात्रय म्हात्रे व शांताराम जीवन मेहेर या ७ जणांच्या घरांना सतत लाटांचा तडाखा बसत असून ती कोणत्याही क्षणी कोसळतील अशी भीती आहे. घटनेची माहिती कळताच वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काही वर्षापूर्वी या गावाच्या सरपंचपदी असताना चेतना मेहेर यांनी बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड, बांधकाम विभाग या सर्व विभागांना पत्र लिहून समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने येथील घरे कोसळतील असे कळवले होते तरी लवकरात लवकर संरक्षक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. परंतु गेल्या ७ ते ८ वर्षात त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यासाठी सुमारे २ कोटी रू. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु हे काम सुरू करण्यात येत नसल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी असून हे काम लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
अर्नाळा किनारी लाटांचा प्रकोप
By admin | Published: March 23, 2015 10:54 PM