Join us

बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:46 AM

कांदिवली पूर्वेकडील एका बँकेच्या शौचालयात ढुरक्या घोणस प्रजाती साप आढळून आला.

मुंबई : कांदिवली पूर्वेकडील एका बँकेच्या शौचालयात ढुरक्या घोणस प्रजाती साप आढळून आला. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बँकेच्या कर्मचाऱ्यांना शौचालयात साप दिसून आल्यावर कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी कर्मचाऱ्यांनी सर्प संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क करून सापाची माहिती दिली. काही वेळात सर्प संस्थेचे सर्पमित्र अमित सडके हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी सापाला ताब्यात घेतले.

सप्रेडिंग अवेयरनेस ऑन रेप्टाइल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे यांनी सांगितले की, ढुरक्या घोणस हा साधारण अडीच फुटांपर्यंतचा होता. तीन दिवस बँकेला सुट्टी होती. त्या वेळी या सापाने शौचालयाचा आसरा घेतला असावा. परंतु बँकेच्या शौचालयाची खिडकी बंद होती. तर हा साप आतमध्ये कसा घुसला, याचे एक कोडेच निर्माण झाले आहे. ढुरक्या घोणस हा जमिनीच्या आतमध्ये राहतो. तो सहसा जमिनीवर दिसून येत नाही. सर्प संस्थेने सापाला ताब्यात घेतले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईसापबँक