आग राेखण्याच्या खर्चाचा भडका, सवलत देण्याची मंडळांची मागणी; अवघ्या ११ दिवसांत लाखाे रुपयांचा भुर्दंड
By रतींद्र नाईक | Published: August 2, 2023 12:27 PM2023-08-02T12:27:04+5:302023-08-02T12:31:20+5:30
नवसाला पावणारा लालबागचा राजा, किंग्ज सर्कलचा जीएसीबी गणपती व मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतूनच नव्हे, तर देश-विदेशातून भाविक येत असतात.
मुंबई : गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण असून मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी पालिकेकडून मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांबाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवल्या जातात. मात्र, अग्निसुरक्षेसाठी महापालिका गणेश मंडळांकडून लाखो रुपये उकळत असून, हे शुल्क माफ करण्यासाठी मंडळांनी यंदा पालिकेला साकडे घातले आहे.
नवसाला पावणारा लालबागचा राजा, किंग्ज सर्कलचा जीएसीबी गणपती व मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतूनच नव्हे, तर देश-विदेशातून भाविक येत असतात. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत भक्तांची या ठिकाणी तोबा गर्दी असते. या उत्सव काळात आग किंवा इतर दुर्घटना घडू नये यासाठी मंडळांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते इतकेच नव्हे, तर पालिकेचे अग्निशमन दल त्या ठिकाणी २४ तास तैनात असते.
अग्निशमन बंब, तसेच काही दलाचे जवान या ठिकाणी ड्यूटीवर असतात. पालिका अग्निसुरक्षेसाठी या मंडळांकडून अनामत रक्कम, तसेच दिवसाकाठी ठराविक रक्कम आकारली जाते. ही रक्कम ३ ते ४ लाख रुपयांच्या घरात असते. दरवर्षी हे शुल्क महापालिकेकडे भरावेच लागते. शुल्काची रक्कम प्रचंड प्रमाणात असल्याने ते अदा करताना मंडळांवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे हे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी गणेश मंडळांनी पालिकेकडे केली आहे. मात्र, पालिकेकडून अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती गणेश मंडळांकडून देण्यात आली.
...तर सूट मिळेल
अग्निशमन दलाकडून मंडपाच्या ठिकाणी दरवर्षी गाड्या तैनात केले जातात. गेल्या वर्षी मंडळांनी या शुल्कात सूट मिळावी, अशी मागणी केली होती. तेव्हा त्यांना सूट देण्यात आली. आताही मंडळांनी अर्ज केला तर त्यांना शुल्कात सूट देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल लालबाग येथे तैनात असते. या अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आमचे कार्यकर्तेही तैनात असतात. मात्र, अग्निशमन दलाकडून आकारण्यात येणारे शुल्क प्रचंड प्रमाणात आहे.
- बाळासाहेब कांबळे, अध्यक्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पैसे आणायचे कुठून?
अग्निशमन दल तैनात करण्यासाठी पालिका पैसे आकारते. ही रक्कम लाखोंच्या घरात असते. आमचे मंडळ कोणाकडेही वर्गणी मागत नाही. त्यामुळे हे पैसे आणायचे कुठून पालिकेने ही वर्गणी आकारू नये ही विनंती - विजय कामथ,
अध्यक्ष, जीएसबी सेवा मंडळ
मुंबई महापालिकेने गणेश मंडळांकडून अग्निसुरक्षेसाठी आतापर्यंत लाखो रुपये घेतले आहेत. मात्र, ही रक्कम फारच जास्त असल्याने शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली आहे. अजूनही पालिकेकडून याबाबत काही उत्तर मिळाले नाही.
- नरेश दहिबावकर,
अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती