जमीर काझी, मुंबईमोनो रेल्वेला सुरुवातीला प्रचंड प्रतिसाद देणाऱ्या मुंबईकरांनी आता मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे प्रवाशांना पुन्हा मोनोकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून केल्या जात आहेत. या उपायांतर्गत मोनो - १ मधील सातही स्थानकांवर आता लवकरच सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.गेल्या फेब्रुवारीपासून ८.८ किलोमीटर अंतराच्या मोनो-१ मुंबईकरांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आली आहे. या मार्गामध्ये चेंबूर, व्ही. एन. पुरव मार्ग, फर्टिलायझर कॉलनी, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क व वडाळा डेपो अशा सात स्थानकांचा समावेश आहे. मात्र पूर्व उपनगरांतील विशिष्ट भाग जोडले गेल्याने प्रवाशांचा त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. अपुऱ्या प्रवाशांमुळे रोज सरासरी एक लाखाचे नुकसान प्राधिकरणाला सोसावे लागत आहे. नागरिकांना सोयीस्कर व उपयुक्त ठरण्यासाठी या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नियोजनाप्रमाणे जूनपर्यंत ही सेवा कार्यान्वित करण्याचे निश्चित केले होते. मात्र काम रेंगाळल्याने त्याचा ‘मुहूर्त’ आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढला आहे. एस्केलेटर्सवर अखेरचा हात फिरविला जात असून, येत्या काही दिवसांमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाईल, असे प्राधिकरणातील सूत्रांनी स्पष्ट केले.
मोनो स्थानकातही एस्केलेटर्स!
By admin | Published: November 03, 2014 1:21 AM