मुंबई - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर डिसेंबरपासून मुंबईविमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, सांताक्रुज (पूर्व) येथील हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेले चार प्रवाशी पळून गेले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केलेल्या आकस्मिक पाहणीतून उजेडात आले. याची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्यावर व हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
मुंबईत २३ डिसेंबर २०२० नंतर आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करून त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या अशा काही आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सांताक्रुज (पूर्व) येथील हॉटेल साई इनमध्ये ठेवण्यात आले होते. या हॉटेलची महापौर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी बुधवारी अचानक पाहणी केली. यावेळी चार प्रवासी पळून गेल्याचे निर्दशनास आल्यानंतर संबंधित प्रवाशांना कुठल्याही परिस्थितीत शोधून त्यांचे विलगीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका अधिकारी व पोलिसांना यावेळी दिले.
महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी हॉटेल मालकावर असते. प्रवाशी पळून गेल्यानंतर हॉटेल मालकाने संबंधित पोलिस स्टेशन व महापालिकेला कळविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कोणाला कळविले नाही, असे महापौर यावेळी सांगितले. अन्य देशांमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर असून त्यानंतरही प्रवाशांना पळून जाण्यास हॉटेल मालक सहकार्य करीत असल्यास ही बाब चिंताजनक आहे. याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधून सर्व हॉटेल मालकांना सक्त ताकीद देणार असून प्रवाशांवर देखील कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.